योगेश पांडे, नागपूर Maharashtra Vidhan Sabha election 2024: महाराष्ट्रासह महायुतीच्या उमेदवारांना नागपूर जिल्ह्यातदेखील दणदणीत विजय मिळाल्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा निवडून आल्याने आता मंत्रिपदासाठी महायुतीत चुरस निर्माण झाली आहे. विशेषत: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पदावर कायम राहणार की त्यांच्याकडे मोठ्या खात्याची जबाबदारी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नागपूर जिल्ह्यातील महायुतीच्या नऊ उमेदवारांपैकी चार जणांची त्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारावर मंत्रिपदावर मोठा दावा राहणार आहे. आता जिल्ह्यातील किती जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
अद्याप राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित झाला नसला तरी जिल्ह्यातून मंत्रिपदाबाबत अनेक कयास लागण्यास सुरुवात झाली आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली व त्यांच्या नेतृत्वात भाजपने मोठा विजय मिळविला आहे.
आता ते या पदावर कायम राहतात की त्यांच्याकडे मोठे खाते येते याबाबत ‘सस्पेन्स’ कायम आहे. बावनकुळे यांच्यासह इतर नेत्यांनी मंत्रिपदांच्या चर्चांवर मौन साधले आहे. दुसरीकडे १.१५ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत रेकॉर्ड प्रस्थापित करणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचा हा विजयाचा चौकार आहे.
खोपडे यांना मागील दोन टर्मपासून मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे त्यांना मंत्री करावे, अशी त्यांच्या समर्थकांकडून मागणी होते आहे. हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांचीदेखील हॅट्ट्रिक झाली आहे. मेघे यांचा राजकीय वर्तुळातील वावर व त्यांची एकूण इमेज लक्षात घेता त्यांच्याकडे मंत्रिपद द्यावे, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून आहेत.
दक्षिण नागपुरातून मोहन मते यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला असला तरी आमदारकीची त्यांची ही तिसरी टर्म असणार आहे. मते यांच्यावर भाजपच्या मोठ्या नेत्यांचा विश्वास असून, त्यांच्याकडे राज्यमंत्रिपद येणार का याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. तर, रामटेकचे शिंदेसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांचादेखील मंत्रिपदावर दावा राहणार आहे.
अशा स्थितीत एकट्या नागपूर जिल्ह्यातूनच किती जणांना मंत्री किंवा राज्यमंत्री पद द्यायचे हा पक्षश्रेष्ठींसमोरील मोठा सवाल राहणार आहे. आता ‘टर्म’च्या आधारे मंत्रिपद दिले जाते की नेत्यांसोबत असलेली जवळीक जास्त कामात येते यावर एकूण चित्र अवलंबून राहणार आहे.
फुकेंच्या समर्थकांकडूनदेखील अपेक्षा
दरम्यान, विधान परिषद आमदार परिणय फुके यांच्याकडे २०१९ मध्ये राज्यमंत्रिपद होते. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांचीदेखील मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे.