व्हीसीएची माहिती : पोलीस बंदोबस्ताचे बिल थकीत नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यांदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आकारण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्था शुल्काबाबत ‘बीसीसीआय’ने टाळाटाळ केल्याची बाब समोर आली आहे. ‘व्हीसीए’तर्फेच (विदर्भ क्रिकेट असोसिएशन) यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेल्या शपथपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे. वारंवार सांगण्यात आल्यानंतरदेखील ‘बीसीसीआय’ने उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचे ‘व्हीसीए’ने स्पष्ट केले.विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर २०१० ते २०१६ या काळात अनेक क्रिकेट सामने खेळले गेले. यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. याचे कोट्यवधी रुपये संघटनेकडे थकीत आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ‘व्हीसीए’कडे ७ कोटी ७८ लाख रुपये थकीत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्याने मांडला. यावर आक्षेप गेत ‘व्हीसीए’ने ४ कोटी ५० लाख रुपये सुरक्षा व्यवस्था शुल्क थकीत होते हे न्यायालयाला सांगितले. यापैकी ३ कोटी २० लाख रुपये संघटनेने महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीमध्ये जमा केले आहेत. आता केवळ १ कोटी २५ लाख रुपये शिल्लक असल्याचे ‘व्हीसीए’तर्फे स्पष्ट करण्यात आले. उर्वरित रकमेपैकी ८९ लाख रुपये ग्रामीण पोलीस मागत असल्याचा मुद्दा ‘व्हीसीए’ने मांडला. यापैकी ३७ लाख रुपयांवर कुणालाही आक्षेप नसल्याचे लक्षात घेत ही रक्कम ‘व्हीसीए’ने एका आठवड्यात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच या रकमेबाबतचा वाद परस्पर सामंजस्याने मिटविता आल्यास बरे होईल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. बीसीसीआयतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एम.जी. भांगडे, व्हीसीएतर्फे अॅड. अक्षय सुदामे, याचिकाकर्त्यांतर्फे अॅड.हरनीश गढिया यांनी बाजू मांडली.
सुरक्षा शुल्काबाबत ‘बीसीसीआय’ने केली टाळाटाळ
By admin | Published: January 20, 2017 2:33 AM