लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : द्राक्षांमध्ये औषधी गुण असले तरी त्यावरील जास्तीच्या कीटकनाशकाच्या वापरामुळे हीच द्राक्षं विविध आजारांना आमंत्रण देत आहे. नागपुरात सध्या द्राक्षं खाल्ल्याने खोकला, घशात खवखव व घसा बसण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टरांनी द्राक्षं जपून खाण्याचा सल्ला दिला आहे.द्राक्षांचे वनस्पतिक नाव विटिस विनीफेरा आहे. द्राक्षांमध्ये कार्बोहायड्रेड्स, प्रोटीन व इतरही महत्त्वाची पोषक द्रव्ये असतात. यामुळे द्राक्षांमधील औषधी गुण पाहून हे फळ काही रोग्यांसाठी वरदान ठरते. काहींच्या मते रोज सकाळी व सायंकाळी चार-चार चमचे द्राक्षांचा रस भोजनानंतर सेवन केल्यास बुद्धी व स्मरणशक्तीचा विकास होतो.द्राक्षे शरीरातील क्षारीय तत्त्व वाढवते. लठ्ठपणा, जॉर्इंट पेन, रक्तांच्या गाठी होणे, दमा आणि त्वचेवर लाल डाग येणे अशा समस्या दूर होतात. द्राक्षांचे सेवन केल्याने आतडे, यकृत पचनसंबंधित अडचणीही दूर करते. असे अनेक फायदे असलेतरी कीड लागू नये म्हणून त्यावर करण्यात आलेल्या अतिप्रमाणातील कीटकनाशके आरोग्यास अपायकारक ठरत आहे.लोकांच्या मते हे फळ पाण्याने धुवून काढल्यानंतरही फळावरील पांढरा थर कायम असतो. असे फळ खाल्यानंतर खोकला, घशात खवखव तर काहींचा घसा बसण्याच्या तक्रारी आहेत.एका मेडिकल स्टोर्सचालकानेही याला दुजोरा देत असे रुग्ण स्व:ताहून औषध घेण्यासाठी दुकानात येत असल्याचे सांगितले.
फळावरील कीटकनाशक घातकचफळांवर अतिप्रमाणात वापरण्यात आलेले कीटकनाशक मानवी शरीरासाठी धोकादायकच आहे. नीट धुवून द्राक्ष न खाल्ल्याने खोकला, घशात खवखव आणि घसा बसल्याचे रुग्ण अलिकडे वाढले आहेत. यामुळे ज्या द्राक्षावर पांढरा थर असेल ती घेऊ नका. कुठलेही फळ नीट धुतल्याशिवाय खाऊ नका. फ्रीजमधील फळे लगेच खाऊ नका. घशाच्या तक्रारी वाढल्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. दिवसातून तीन वेळा कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने फायदा होऊ शकतो.-डॉ. अविनाश गावंडेबालरोग तज्ज्ञ
नमुने तपासले जातीलकीटकनााशकाचा पांढरा स्तर असलेली द्राक्षे बाजारात असतील तर ती धोकादायक आहे. अशा द्राक्षांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविली जातील. यात जर कीटनाशके आढळून आल्यास कारवाई केली जाईल.-मिलिंद देशपांडेसहायक आयुक्त, अन्न प्रशासन