लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : किराणा दुकान असो वा सोन्याचांदीचे, इलेक्ट्रॉनिक काट्यामुळे फसवणुकीची भीती नाही, या भ्रमात तुम्ही असाल तर ते चुकीचे आहे. कारण अनेक दुकानदार इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याच्या मापात फेरफार करतात. इलेक्ट्रॉनिक काट्यांपैकी ५० टक्के काट्यांमध्ये दोष असून त्याकडे वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक कबाडी इलेक्ट्रॉनिक्स काटा घेऊन वस्त्यांमध्ये फिरून लोकांकडून भंगार विकत घेतल्याचे दिसत आहे. पण तो वजनात हेरफेर करीत असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी एका माणसाचे वजन व लोखंडी गेटचे वजन केले आणि कबाडी रिमोटद्वारे मूळ वजन कसे कमी करतो, हे इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यावर प्रात्यक्षिक करून दाखविले आहे.एका माणसाचे ५७ किलो वजन तो रिमोटने २५ किलो आणि लोखंडी गेटचे मूळ २६ किलो ६०० ग्रॅम वजन तो ११ किलो ८०० ग्रॅमपर्यंत कसे कमी करतो, हे व्हिडिओत दिसून येत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या दारात भंगार वा पेपर रद्दी विकत घेण्यासाठी आलेल्या कबाडीपासून सावधान राहण्याची गरज आहे.तुम्हाला बोलण्यात गुंतवून विकलेल्या वस्तूंचे वजन कबाडी अर्ध्यावर आणतो आणि वजनाचे पैसे देऊन लगेच निघून जातो. हा व्यवहार वजनमापशास्त्र विभागांतर्गत येतो.अशा कबाडींवर कारवाई केल्याची विभागाकडे एकही नोंद नाही. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामागील सीलची खात्री ग्राहकांनी करून घेणे आवश्यक आहे.
ग्राहकांची होतेय लूटबाजारात दूध, सीलबंद पाणी, बिस्किटे, शीतपेये या सर्वांवरील छापील किमतीत वस्तू विकण्याची सक्ती आहे. पण दुकानदार शीतपेय व पाणी थंड करण्याच्या नावाखाली दोन रुपये अधिक घेतो. गॅस सिलिंडर घरी आणला जातो तेव्हा संबंधित गॅस एजन्सीला कंपनीने दिलेल्या वजन काट्यावर वजन करून दाखवण्याची सक्ती आहे. पण कधीही वजन होत नाही. तसेच नामांकित कंपन्यांची अनेक प्रकारची खाद्यपदार्थांची पाकिटे दुकानांवर मिळतात, परंतु या पाकिटांवर दिलेले वजन आणि पाकिटात असलेल्या खाद्यपदार्थांच्या वजनात तूट असल्याचा प्रकार अनेकदा दिसून येतो. आठवडी बाजारातही एक किलो भाजी पाऊण किलो मिळाल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत. याकडेही विभागाने कानाडोळा केल्याचे दिसून येते. अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्राहक संघटनांची मागणी आहे.