नागपूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, नागपूर जिल्ह्यासाठी चिंता वाढली आहे. २४ तासातच नव्या बाधितांची संख्या दुप्पट झाल्याचे दिसून आले. बुधवारी जिल्ह्यात ४०४ रुग्णांची नोंद झाली, तर ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या हजारांहून अधिक झाली आहे.
मंगळवारी नागपूर जिल्ह्यात १९६ बाधित आढळले होते. बुधवारी यात २०८ नवे रुग्णाची भर पडली. चाचण्यांची संख्या वाढली व जिल्ह्यात ७ हजार १०७ चाचण्या झाल्या. यातील ५ हजार २२१ शहरात, तर २ हजार ८८६ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या. एकूण चाचण्यांपैकी ४.९८ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
नागपूर शहरात ३२९, तर ग्रामीण भागात ४९ बाधितांची नोंद झाली, तर २६ बाधित जिल्ह्याबाहेरील होते. नागपूर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ९४ हजार ९२६ वर पोहोचली असून, मृत्यूसंख्या १० हजार १२३ वर स्थिर आहे. बुधवारी २४ रुग्ण बरे झाले व बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ८३ हजार ७२७ वर पोहोचली आहे.
४०० रुग्ण गृहविलगीकरणात
सद्य:स्थितीत नागपूर जिल्ह्यात १ हजार ७६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात शहरातील ९०६, ग्रामीणमधील १२६ व जिल्ह्याबाहेरील ४४ रुग्णांचा समावेश आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४०० रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर ५६१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.
जिल्ह्यात ओमायक्रॉनचे १५ रुग्ण
मंगळवारी जिल्ह्यात ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्या १३ इतकी होती. बुधवारी आणखी दोन रुग्ण वाढल्याने हा आकडा १५ वर पोहोचला आहे.