आॅनलाईन लोकमतनागपूर : ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या पॅकेटमध्ये बनावट दागिने ठेवले आणि तब्बल ४३ लाख रुपये किमतीचे खरे दागिने लांबविले. वाडी या भागातील मुथुट फायनान्समधील हा प्रकार असून याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.आशिष श्याम थॉमस असे आरोपीचे नाव आहे. तो मुथुट फायनान्सच्या वाडी शाखेच्या व्यवस्थापकपदी होता. मुथुट फायनान्समध्ये १४०० ग्राहकांनी दागिने गहाण ठेवले. त्यापैकी ४७ ग्राहकांचे पॅकेट आशिष थॉमस याने २१ मार्च ते २९ नोव्हेंबरदरम्यान बदलविले. त्याऐवजी बनावट दागिने पॅकेटमध्ये ठेवले. या दागिन्यांची किंमत ४३ लाख ४१ हजार ४९६ रुपये आहे.मुथुट फायनान्सचे आॅडिट इन्चार्ज सुजितकुमार यांनी काही दिवसांपूर्वी वाडी शाखेचे आॅडिट केले. दरम्यान त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी स्वर्ण पॅकेटची तपासणी केली असता त्यात बनावट दागिने आढळून आले. यानंतर फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. याबाबत मुथुट फायनान्सचे प्रादेशिक व्यवस्थापक विचित्र नारायण पाठक (६१, रा. सीए रोड, नागपूर) यांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी आरोपी शाखा व्यवस्थापकाविरुद्ध भादंविच्या कलम ४०८, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.ए. देशमुख करीत आहेत.
सावधान ! फायनान्स कंपनीने सोन्याऐवजी दिले बनावट दागिने; ४३ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 11:07 AM
ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या पॅकेटमध्ये बनावट दागिने ठेवले आणि तब्बल ४३ लाख रुपये किमतीचे खरे दागिने लांबविले. वाडी या भागातील मुथुट फायनान्समधील हा प्रकार असून याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देमुथुट फायनान्सच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल