नागपूर : सणासुदीच्या दिवसात अनेकजण काही ना काही खरेदी करण्याचा विचार करतात. अशा वेळी सोशल मीडियावर अनेक ऑफर येतात. ऑनलाईन आलेल्या या ऑफरच्या माध्यमातून अनेकदा नागरिकांची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे फेस्टिव्हल ऑफर्सच्या मॅसेजला प्रतिसाद देताना काळजी घेतल्यास नागरिकांची फसवणूक टळू शकते, असा सल्ला सायबर क्राईमच्या पोलिसांनी दिला आहे.
-ऑनलाईन फसवणूक
जानेवारी : ३
फेब्रुवारी : १
मार्च : ०
एप्रिल : २
मे : १
जून : १
जुलै : १
ऑगस्ट : ३
गिफ्ट मिळाल्याचे सांगून फसवणूक
-सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अश्विनी या २५ वर्ष वयोगटातील युवतीला तुम्हाला ॲमेझॉन कंपनीकडून गिफ्ट मिळाले आहे, असे सांगून तिला एक मॅसेज पाठविला. त्यावर जाऊन तिने वैयक्तिक माहिती आणि बँकेची माहिती भरली. त्यानंतर तिने समोरील व्यक्तीला ओटीपी दिला. लगेच तिच्या खात्यातून ५५०० रुपये काढून तिची फसवणूक करण्यात आली.
आयफोनच्या मोहात गेले ११२०० रुपये
-सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत अशोक नावाच्या ५८ वर्षाच्या इसमाला ऑगस्ट महिन्यात ॲमेझॉनवर तुमच्यासाठी ऑफर आलेली आहे, असा व्हॉट्सॲपद्वारे मॅसेज आला. ११२०० रुपयात आयफोन सेव्हन मिळत आहे, असे सांगितले. त्यांनी ऑनलाईन पैसे भरले. परंतु त्यांना कोणतेही गिफ्ट मिळाले नाही.
गिफ्ट, कॅश बॅक, लकी ड्रॉच्या मॅसेजकडे दुर्लक्ष करा
‘ॲमेझॉन किंवा इतर कंपन्यांच्या ॲपशिवाय व्हॉट्सॲप किंवा मॅसेजद्वारे येणारे गिफ्ट, कॅश बॅक किंवा लकी ड्रॉ बद्दलच्या मॅसेजवर विश्वास ठेवू नका. ऑनलाईन गिफ्ट मिळाले आहे, असा मॅसेज आल्यास अशा मॅसेजकडे दुर्लक्ष करा. अशा मॅसेजमधून फायद्याऐवजी नुकसानच होण्याची अधिक शक्यता असते.’
-केशव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन नागपूर
........