सुमेध वाघमारे,नागपूर : नागपुरकर दरवर्षी दाहक उन्हाळा अनुभवतात. याची सुरूवात झाली आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या सुरुवातीला होणाऱ्या कांजण्या म्हणजे ‘चिकन पॉक्स’चा रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रोज जवळपास ६ ते १० रुग्ण आढळून येत आहेत. कांजण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार असल्याने काळजी घेण्याचे आवाहन, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.
कांजण्या ‘व्हारीसोला झोस्टर’ या विषाणूमुळे हा रोग होतो. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहून प्रौढावस्थेत 'नागीण' या रोगाद्वारे प्रकट होतो. या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर १० ते २१ दिवसांत लक्षणे दिसायला सुरुवात होतात आणि पुढील ५ ते १० दिवसांपर्यंत ती लक्षणे तशीच राहतात. कांजण्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय होणारा आजार आहे.
ही आहेत लक्षणे- काही जणांना तापाने काजण्याची सुरूवात होते. त्यानंतर काहीं तासात किंवा एकदोन दिवसात डोके, मान किंवा शरीराच्या वरील भागामध्ये तांबूस रंगाचे लहान पुरळ येण्यास प्रारंभ होतो. पुढील १२ ते २४ तासात पुरळावर खाज सुटते, पुरळ पाण्याने भरतात. दोन ते पाच दिवसात त्यांच्या संख्येत वाढ होते. त्वचेवर जुन्या पुरळाबरोबर नवे येतच राहतात. कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काही रुग्णामध्ये तोंडाच्या आतील बाजूस, नाकामध्ये, कानामध्ये आणि योनी आणि गुदद्वाराजवळ पुरळ उठतात. काहीं रुग्णामध्ये पुरळांची संख्या कमी असते. पण शरीरावर २५०-५०० पुरळ येणे ही सर्वसामान्य बाब आहे.
पुरळ खाजवू नये - कालांतराने पुरळावर खपली धरते. खपल्या पडून जातात. पुरळ खाजविले नाहीत तर त्वचेवर डाग पडत नाहीत. खाजविल्याने पुरळामध्ये जंतुसंसर्ग होतो. कधीकधी पुरळ आलेल्या ठिकाणी त्वचा अधिक काळवंडते. खाजेचे प्रमाण कमी अधिक असते. काही कांजण्याच्या रुग्णामध्ये डोकेदुखी, ताप , पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. पाच ते दहा दिवसांत रुग्ण पूर्ण बरा होतो. प्रौढ रुग्णामध्ये रोगाची तीव्रता वाढते.
चिकन पॉक्सला केव्हा धोकादायक होतो - गर्भवतिंना, एचआयव्हीबाधितांना, गंभीर मधुमेहींना व स्टेरॉयडचा जास्त डोज घेणाºयांसाठी चिकन पॉक्स जास्त धोकादायक होऊ शकतो. आजाराच्या रक्तस्त्रावी स्वरुपातील (हेमोरेजिक फॉर्म) रुग्णांमध्ये जास्त गुंतागुंत येऊ शकते. मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये जास्त समस्या वाढण्याचे कारण ठरू शकते. श्वास घेणे कठीण होणे, खूप जास्त डोकेदुखी किंवा स्मृतिभ्रंश स्थितील रुग्णांसाठी हा आजार खूप जास्त गंभीर होऊ शकतो.
मुलांना विशिष्ट वयात लस दिली जावी - सुदृढ बालकांना कांजण्यांसाठी वैद्यकीय उपचारांची गरज नाही. खाज कमी करायला अॅलर्जी प्रतिबंधात्मक औषधे देतात. धोक्याच्या गुंतागुंती असलेल्या रुग्णांना विशेष उपचाराची गरज पडते. आजाराचा बचावासाठी कांजण्याची लस उपलब्ध आहे. लस घेतल्यास कांजण्या होण्याची शक्यता कमी होते, लस घेऊनही कांजण्या झाल्या तरीही त्या सौम्य असतात. मुलांना विशिष्ट वयात लस दिली जावी. मुलांमध्ये पहिला डोज १२ ते १५ महिन्याच्या वयात आणि दुसरा डोज हा वयाच्या ४ ते ६ वर्ष वयात दिले जाते.-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक मेडिकल