लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावधान! शहरात आयएसआय मार्क लावून विकण्यात येणारे बाटलीबंद पाणी अशुद्ध असू शकते. बोगस आयएसआय मार्क लावून बाजारात बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या तीन उत्पादक फर्मवर गुरुवारी भारतीय मानक ब्यूरोच्या (बीआयएस) अधिकाऱ्यांनी धाडी टाकून पर्दापाश केला आहे. त्यांच्याकडून विक्रीसाठी तयार असलेल्या विविध आकाराच्या बाटलीबंद पाण्याच्या बॉटल्स जप्त केल्या. या उत्पादकांविरुद्ध विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
बीआयएसने ही कारवाई लक्ष्मी इंटरप्राईजेस, कपिलधारा दूध डेअरीजवळ, नागपूर रोड, सावनेर, हेल्थ केअर, प्लॉट नं ए-४८, एमआयडीसी, सावनेर आणि नंदिनी इंटरप्राईजेस, प्लॉट नं. ०२, संभाजीनगर, नरसाळा या तीन फर्मवर केली. या कंपन्यांचे एक लिटर, ५०० एमएल आणि २५० एमएल आकाराचे बाटलीबंद पिण्याचे पाणी ग्राहकांनी खरेदी करू नये, असे आवाहन बीआयएसने केले आहे.
अधिकाऱ्यांनी लक्ष्मी इंटरप्राईजेसमधून अॅक्वा समुद्र ब्रॅण्डच्या बोगस आयएसआय मार्क असलेल्या एक लिटर क्षमतेच्या ५०० पेक्षा जास्त पेट बॉटल, हेल्थ केअर इंडस्ट्रीमधून ५०० एमएल क्षमतेच्या ग्रेसी अॅक्वा ब्रॅण्डचे ६३ बॉक्सेस (एक बॉक्स २४ पेट बॉटल) व एक लिटरचे ७५ बॉक्सेस (एक बॉक्स १२ बॉटल) आणि नंदिनी इंटरप्राईजेसमधून ५०० एमएलचे ग्रेसी अॅक्वा ब्रॅण्डचे ४४ बॉक्सेस (एक बॉक्स २४ पेट बॉटल) व २५० एमलएलचे १५ बॉक्सेस (एक बॉक्स ४८ पेट बॉटल) एवढा साठा जप्त केला. उत्पादनावर आयएसआय मार्कचा दुरुपयोग करणाऱ्यांची माहिती बीआयएस नागपूर शाखेला द्यावी, असे आवाहन भारतीय मानक ब्यूरोचे प्रमुख विजय नितनवरे यांनी केले आहे.