ठळक मुद्देन्या. भूषण धर्माधिकारी : हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे प्रकट मुलाखत
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानाने घालून दिलेल्या कर्तव्याचे पालन प्रत्येक नागरिकाने केलेच पाहिजे. मात्र न्यायपालिकेत सेवा देणाऱ्यांसाठी ही जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे. कारण न्यायपालिका हा संविधानाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे नव्या वकिलांनी आपले वरिष्ठ, सहकारी, येथे चालणाऱ्या प्रक्रियेबद्दल चुकीचे बोलणे टाळावे. हास्य निर्माण करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा आदर ढळू देऊ नका. त्यामुळे तुमचीही प्रतिमा उंचावेल. न्यायपालिका हे संविधानाचे पवित्र कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे याची प्रतिष्ठा सांभाळूनच आचरण ठेवा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी वकिलांना दिला.हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूरच्या स्टडी सर्कल सेंटरतर्फे ‘मेकिंग आॅफ लिजेंड’ या शीर्षकाखाली न्या. भूषण धर्माधिकारी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील आणि अॅड. गौरी व्यंकटरमण यांनी त्यांची मुलाखत घेतली. ‘मी कसा घडलो’ हे सांगताना न्या. धर्माधिकारी यांनी आतापर्यंतचा प्रवास उलगडला. पणजोबा न्यायमूर्ती होते, आजोबा शंकर धर्माधिकारी स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते व त्यांचे महात्मा गांधी, विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्याशी जवळचे संबंध होते. वडील मात्र या क्षेत्रात आले नाही, पण दोन्ही काका वकील होते. दुसरीकडे आईचे आजोबा न्यायमूर्ती होते. अशी पार्श्वभूमी असताना ठरवून या क्षेत्रात आलो असे नाही, तर सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षणाच्या प्रवाहात वाहतानाच वडिलांच्या सांगण्यावरून या क्षेत्राकडे वळल्याचे त्यांनी सांगितले. येथे आल्यानंतरही सरकारी वकील, बचाव पक्षाचे वकील की न्यायाधीश व्हायचे, असे काही ठरविले नव्हते. मात्र कोणत्याही क्षेत्रात काम करताना आवश्यक असलेली प्रामाणिकता मी जपली. न्यायव्यवस्थेबाबत अधिकाधिक शिकत गेलो. न्यायालयात जाऊन सुनावणी पाहणे, ती समजून घेणे, त्यासाठी आवश्यक कायद्यांचा अभ्यास करणे व इतर आवश्यक गोष्टी प्रामाणिकपणे केल्याचे त्यांनी सांगितले.वकील म्हणून स्वतंत्रपणे काम सुरू केल्यानंतर ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. त्यांच्याकडे दररोज विविध न्यायालयाच्या २५० पेक्षा जास्त केसेस असायच्या. हा व्याप कसा सांभाळला हे सांगताना, आपली आठवण क्षमता व काम करणारे शिकाऊ वकील यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा ज्युनियरप्रमाणे प्रत्येक प्रकरणाची माहिती राहील अशी फाईल तयार केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे सांगताना कनिष्ठ न्यायालय, कामगार न्यायालय, सिव्हील कोर्ट तसेच हायकोर्टातील अनेक प्रकरणांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी व्यासपीठावर स्टडी सर्कल कमिटीचे चेअरमन अविनाश गोरडे प्रामुख्याने उपस्थित होते. शिकाऊ वकिलांसाठी हवे स्टायपंडविधी पदवी प्राप्त केल्यानंतर वकिलांना शिकाऊ म्हणून वरिष्ठ वकिलाकडे काम करावे लागते. हा ‘वेटिंग पिरेड’ पाच किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो. यादरम्यान त्याला कुठलेही मानधन मिळत नाही. डॉक्टर किंवा अभियंता झालेली व्यक्ती त्यांच्या क्षेत्रातील कामाने पैसा कमावू शकतो. वकिलांचे तसे नाही. त्यामुळे पालकांना आपला मुलगा वकील व्हावा असे वाटत नाही. वरिष्ठ वकिलांनी त्यांच्या मिळकतीतील काही मानधन शिकाऊ वकिलांना द्यावे किंवा शासनाने तरी अशा वकिलांसाठी स्टायपंड सुरू करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.न्यायमूर्तींची विनोदबुद्धीवकील श्रेष्ठ की न्यायाधीश, या प्रश्नाचे उत्तर देताना न्या. धर्माधिकारी म्हणाले, प्रत्येक माणसाला इतरांना फुकटचा सल्ला देण्याची व इतरांच्या भानगडीत नाक खुपसण्याची सवय असते. वकिलांना कायद्याने नाक खुपसण्याचा हक्क दिला आहे व त्याला त्याचे पैसेही मिळतात. न्यायाधीश या दोघांचेही नाक तपासू शकतो, असे सांगताना सभागृहात हशा पिकला. बार असोसिएशनच्या निवडणुका व इतर प्रश्नांची उत्तरे देतानाही त्यांचा हा मिश्कील स्वभाव पुढे आला.