लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वी सडका कांदा, बटाटा, अळ्या पडलेला मैदा व्यापारी फेकून द्यायचे, तर मोठे हॉटेल्सवाले एका मर्यादेपर्यंत तेलाचा वापर झाल्यास ते नष्ट करायचे. परंतु आता या सर्व निकृष्ट दर्जाच्या व जीवाला हानी पोहचविणाऱ्या पदार्थांना चांगले दिवस आले आहे. कारण याच पदार्थांमधून समोस्यापासून ते कचोरीपर्यंतचे पदार्थ तयार होत आहे. याची किमतही १० रुपयावर नसल्याने हातोहात विकलेही जात आहे. जीवाला धोका पोहचविणारा हा प्रकार ‘एफडीए’ आणि महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून चौकाचौकात सुरू आहे. परंतु या जबाबदार विभागाला याचे सोयरसुतक नसल्याचे वास्तव आहे.शहरात सर्वत्र उघड्यावर अन्नपदार्थांची जोरात विक्री सुरू आहे. विशेषत: १० रुपये प्लेटच्या हिशेबाने मिळणारा समोसा, कचोरी, आलुबोंडा, मिर्ची भजी, वडा हे नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. महागाई वाढली असताना एवढ्या कमी किमतीत मिळणारे हे पदार्थ तयार कसे होतात याची पाहणी ‘लोकमत’ चमूने केली.
गटारीजवळ लावली भट्टी आणि उकडले बटाटेटेलिफोन एक्सचेंज चौकाच्या परिसरात १० रुपये प्लेटने खाद्यपदार्थ विक्री करणारे तीन हॉटेल्स आहेत. हे तिघेही फूटपथावरच पदार्थ तयार करतात आणि विकतातही. फूटपाथ खालून पालिकेचे गटार वाहते. यामुळे या भागात दुर्गंधीयुक्त आणि कुबट वास पसरला असतो. त्याच वातावरणात एकाने भट्टी लावून त्यावरील एका काळ्याकुट्ट गंजात सडके आलू टाकले. उकडल्यानंतर त्याला एका मोठ्या ताटात काढून तेथेच सोलले, तर दुसऱ्याने घाणेरड्या हाताने त्याला कुस्करले. त्याच ठिकाणी फोडणीही दिली. तयार झालेली ही चटणी त्याच घाणीत समोस्यात व आलुबोंड्यात भरली आणि एका मोठ्या मळकट कढाईमधून तळून काढली.
५ रुपये किलोचे बटाटे तर ८ रुपये किलोचा कांदासध्या बाजारात चांगल्या बटाट्याचा भाव १५ रुपये तर कांद्याचा भाव २० रुपये आहे, परंतु हे सडके व किड लागले असेल तर त्याला पाच ते आठ रुपये भाव मिळतो. १० रुपये प्लेट खाद्यपदार्थ विकणारे हॉटेल्सवाल्यांना हाच भाव परडवत असल्याने तेच याची खरेदी करतात. आणि यातूनच तयार होतो समोस्यापासून ते आलुबोंडे.