नागपूर : वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हे अत्यंत धोक्याचे असते. मोबाईलवर बोलताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही वाढत आहेत. पण नागपूरकर वाहनचालक जिवाची काळजीच नसल्यासारखे वागत आहेत.
एकतर डोक्यावर हेल्मेट नाही, त्यात भन्नाट वाहने, कानाला मोबाईल माना तिरप्या करून दुचाकी चालविणारे अनेक महाभाग रस्त्यावर दिसून येतात. या प्रकारामुळे वाहनचालकाचा जीव धोक्यात येऊ शकतो. लोकमतने शहरातील वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करू नये, या उद्देशातून वृत्तमालिका सुरू केली आहे. या अंतर्गत शहरात वाहतुकीचा वेध घेत असताना अनेक वाहनचालक दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलत असल्याचे आढळले. वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास वाहतूक पोलिस कारवाई करू शकते. यात पोलिसांना दंडात्मक कारवाईचा अधिकार आहे: पण या कारवाया वाहतूक पोलिसांकडून फारश्या होताना दिसत नाही. त्यामुळेच दुचाकीचालक बेमुर्वतपणे वाहन चालवितांना मोबाईलवर बोलतात.
विशेष म्हणजे वाहतुकीचे नियम वाहनचालकांनी पाळावे म्हणून वाहतूक विभाग सिग्नलवर अनाऊंसमेंट, रस्त्यावर होर्डिंग, बॅनर, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करतात. मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या बाबतीत सोशल मीडियावरील वाहतूक विभागाकडून एक मेसेज लक्ष वेधून घेतो. एका संदेशात यमराज म्हणतात वाहन चालविताना चुकीने तुमचा कॉल मला लागू शकतो. तरीही वाहनचालक एकत नाही आणि आपला जीव गमावून बसतात. मोबाईल आजघडीला अत्यावश्यक बनला असला तरी काही ठिकाणी मोबाईलचा वापर करणे टाळावे. मात्र काहीजण मोबाईलवर सतत लागून राहतात. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवू नये किंवा वाहन चालविताना कुणाचा फोन आला तरीही त्याला उचलू नये, असे वाहतूक नियम असताना वाहन चालक त्या नियमाला मोडून धुंदीत वाहन चालवित स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. असला हलगर्जीपणा करणाऱ्या वाहन चालकांना धडा शिकविणे गरजेचे आहे.
- वाहने चालविताना व्हॉट्सॲपही करतात चेक
शहरातील रस्त्यावर लोकमतने काही वाहनचालकांचे छायाचित्र टिपले. यामध्ये काही वाहनचालकाच्या एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात वाहनेचे हॅण्डल दिसून आले. काहीजण हेल्मेटच्या खाली मोबाईल टाकून बोलताना आढळली. काहींनी कानात इअर फोन लावून बोलत बोलत वाहन चालविताना आढळली. काहीतर वाहन चालवितांना व्हॉट्सॲपही चेक करताना आढळून आली. शहरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाहन चालविताना थोडीजरी नजरचूक झाली तर अपघाताचा धोका आहे. तरीही या वाहनचालकांची ही जीवघेणी कसरत कशासाठी असा सवाल वाहतुकीच्या नियमाबाबत सजग असलेले नागरिक करताहेत.
- अपघात टाळण्यासाठी वाहन चालविताना मोबाइल वापरू नये
वाहन चालवितांना मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध वाहतूक पोलिस कलम १८४ (सी) नुसार कारवाई करतात. यात दुचाकीला १ हजार रुपये तर चारचाकी वाहनचालकाकडून २ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये.
-किशोर नगराळे, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक, सोनेगाव वाहतूक विभाग
- ‘सर्व्हायकल स्पाँडिलोसिस’चा धोका
दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलल्याने अपघाताची शक्यता कित्येक पटीने वाढते. त्याचबरोबर कान व मानेच्यामध्ये मोबाइल ठेवून बोलत असाल तर आताच सतर्क व्हा. यामुळे ‘मसल्स प्लाझ्मा’ किंवा ‘सर्व्हायकल स्पाँडिलोसिस’ म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ, मानेच्या मणक्यांमधील गादी खराब होणे, बाहेर येणे आदींचा धोका वाढतो. वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यास लक्ष विचलित होते. अपघात होऊन मेंदूला जबर मार बसण्याची व हाडे फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता असते.
- डॉ. अलंकार रामटेके, अस्थिरोग तज्ज्ञ