नागपूर : ऑनलाइन लग्नासाठी नोंदणी केलेल्या अनेक युवतींची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार अशा युवतींच्या भावनेला हात घालून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे लग्नासाठी एखाद्याने पैसे मागितल्यास युवतींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
...अशी होऊ शकते फसवणूक
अमेरिकेतील स्थळ पडले महागात
-कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती इंजिनिअर आहे. ती पुण्याला जॉब करत होती; परंतु घरी आईची प्रकृती बरी नसल्यामुळे ती जॉब सोडून नागपुरात आली. तिने शादी डॉट कॉम या वेबसाइटवर नोंदणी केली होती. एका युवकाचा तिला फोन आला. त्याने आपण अमेरिकेत आर्किटेक्चर असल्याचे सांगितले. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर तो तिच्यासाठी महागडे गिफ्ट घेऊन येत असल्याचे सांगितले. आपण दिल्लीला आल्याचे सांगून माझ्याकडे डॉलर आहेत. गिफ्ट सोडविण्यासाठी इंडियन करन्सी पाहिजे, असे सांगून त्याने त्या युवतीकडून वेळोवेळी ४.२२ लाख रुपये मागितले. पैसे मिळाल्यानंतर त्याने मोबाइल बंद केला आणि तिची फसवणूक केली.
भेटवस्तू पडल्या महागात
-अजनी पोलीस ठाण्यांतर्गत राहत असलेली एक युवती इंजिनिअर आहे. तिनेे शादी डॉट कॉमवर नोंदणी केली होती. तिला एका युवकाने फोन करून तुमची प्रोफाइल आवडल्याचे सांगितले. त्याने तिला महागड्या भेटवस्तूंचे फोटो पाठवून दोन दिवसांत भेटवस्तू तुला मिळतील, असे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी या युवतीला एका इसमाचा फोन आला. मी कस्टम ऑफिसमधून बोलत असून, तुमच्या महागड्या भेटवस्तूसाठी कर भरावा लागेल, अशी बतावणी केली आणि त्या युवतीकडून १.३२ लाख रुपये उकळले. त्यानंतर युवतीने संबंधित मोबाइलवर फोन केला असता मोबाइल बंद झाला होता. त्यामुळे तिने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
...ही घ्या काळजी
-उपवर मुला- मुलींच्या नातेवाइकांनी प्रत्यक्ष भेट घ्यावी.
-संबंधीताच्या पक्क्या पत्त्यावर जाऊन खात्री करावी.
-परदेशी स्थळ असेल तर अधिक सतर्क होऊन बोलावे.
-प्रत्येक बाबीची खात्री केल्यानंतरच बोलणी करावी.
-खात्री होण्याआधी कोणत्याही भेटवस्तू घेण्याच्या मोहात पडू नये.
खात्री करूनच निर्णय घ्या.
‘ऑनलाइन विवाह नोंदणी साइटच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये यासाठी आपण संबंधित व्यक्ती, त्याचा धंदा व राहण्याचे ठिकाण इत्यादीबाबत स्वत: प्रत्यक्ष व पूर्ण माहिती घ्यावी. कोणत्याही महागड्या भेटवस्तू पाठवीत आहे, असे म्हणून त्याचा टॅक्स भरण्यासाठी कोणी बोलत असेल, तर आपली फसवणूक होत आहे, हे लक्षात घ्या. जर आपल्यासोबत अशी फसवणूक झाली असेल, तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा.’
-केशव वाघ, ठाणे प्रभारी अधिकारी, सायबर पोलीस स्टेशन, नागपूर शहर
.........