नागपूर : अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे; परंतु नात्यात लग्न करताय तर आताच सावधान व्हा. अशा लग्नामुळे आनुवंशिक आजाराचे प्रमाण वाढते.
वंशपरंपरेने किंवा आनुवंशिकतेने जनुकांद्वारे मात्या- पित्याकडून अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात. यामुळे जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आरोग्यविषयक समस्या जास्त उद्भवू शकतात. एका पिढीतून पुढच्या पिढीत त्याचे परिणाम जास्त दिसून येतात.
-नात्यात लग्न नकोच
काका, मामा, पुतणी, मावसबहीण यांच्यातील विवाह, मावस किंवा चुलत भाऊ बहिणीमधील विवाह किंवा मामाची मुलगी व आत्याच्या मुलामधील विवाह. याशिवाय थेट रक्ताचे नाते असलेल्यांमध्ये विवाह झाल्यास त्याला वैद्यकीय भाषेत ‘कॉनसॅनग्यूनस मॅरेज’ असे म्हणतात. नात्यात झालेल्या लग्नातून होणाऱ्या अपत्यामध्ये गतिमंदतेसह इतर आजारांचा धोका असतो.
-या आजारांचा धोका
:: नात्यात लग्न केल्याने प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो.
:: गर्भपाताचे प्रमाण वाढू शकते.
:: ‘स्टील बर्थ’ म्हणजे गर्भात बाळाचा मृत्यू होऊ शकतो.
:: इतर मुलांच्या तुलनेत मुलाचा बुद्ध्यांक कमी होऊ शकतो.
:: परंतु ज्यांचे नात्यात लग्न झालेले आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. जेनिटिक कौन्सिलर किंवा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना या विषयी माहिती द्यावी. आनुवंशिक आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी.
-‘थॅलेसेमिया’चाही धोका
दोन ‘थॅलेसेमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्ये अत्यंत घातक थॅलेसेमिया पीडित होऊ शकते. ज्यामुळे जीवहानी होण्याची भीती असते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा ज्या विवाहित स्त्री-पुरुष अपत्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींना ‘थॅलेसेमिया मायनर’ची रक्त चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘थॅलेसेमिया मेजर’ या रोगाने पीडित मुले शरीरात रक्त कमी असल्या कारणाने पिवळी पडतात. भूक, वजन आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने शारीरिक विकासही कमी होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अशा रुग्णांना वेळोवेळी रक्त पुरवठा करण्याची गरज भासते. या रोगाचा उपचार खूप कठीण आणि खर्चिक आहे.
- नात्यात लग्न टाळलेलेच बरे
जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. यात रक्तविकारांसह मेंदू व मांसपेशी संदर्भातील आजार होण्याचा धोका असतो. विशेषत: सिकलसेल व थॅलेसेमिया आजाराचा धोका वाढतो. यामुळे शक्यतो जवळच्या नात्यात लग्न टाळलेलेच बरे. लग्न झाले असले तर अपत्य होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. दीप्ती चांद, प्रमुख मेडिसिन विभाग, मेयो