उमरेड : तरुण मंडळी वस्तूंची ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र, हा व्यवहार करताना त्यांची फसवणूक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा प्रकार उमरेड शहरात नुकताच घडला असून, संबंधिताने कार खरेदीच्या नावावर तरुणास १ लाख १२ हजार रुपयांनी फसविले आहे.
अंकुश वसंता वाघमारे (२५, बुधवारी पेठ, उमरेड) याला कार खरेदी करावयाची असल्याने त्याने ‘ओएलएक्स’ या‘ॲप’वर चाचपणी केली. या ‘ॲप’वर त्याला एमएच-१२/केई--३२४० क्रमांकाची कार पसंत आली. त्यामुळे अंकुशने त्या जाहिरातीवर नमूद असलेल्या माेबाईल क्रमांकावर संपर्क केला. चर्चेदरम्यान त्या कारची किंमत १ लाख ५० हजार रुपये ठरविण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या सूचनेवरून अंकुशने त्याच्या बॅंक खात्यात ‘फाेन पे’द्वारे वेळाेवेळी १ लाख २० हजार ५० रुपये जमा केले आणि अंकुशने याबाबत संबंधित व्यक्तीला रक्कम जमा केल्याबाबत सूचनाही दिल्या.
त्यानंतर वारंवार मागणी करूनही त्याला कार हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंकुशने पाेलिसात तक्रार दाखल केली. ‘ऑनलाईन’ आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस निरीक्षक विलास काळे यांनी दिली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी ‘ॲप’वर नमूद असलेल्या माेबाईल क्रमांकधारकाविरुद्ध भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० सहकलम ६६ (डी) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक विलास काळे करीत आहेत.