पोलिसांनी प्रबोधनावर भर देण्याची गरज : नक्षल विरोधी प्रशिक्षण कार्यशाळेतील मतनागपूर : राज्यातील शहरी भागात मोठ्या प्रमाणावर नक्षल चळवळीचे जाळे पसरविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यामुळे हिंसेवर विश्वास ठेवणाऱ्या चळवळीपासून तरुणांनी वेळीच सावध होऊन स्वत:ला दूर ठेवावे आणि पोलिसांनीही तरुणांचे सातत्याने प्रबोधन करून त्यांना नक्षल चळवळीकडे जाण्यापासून रोखावे, असे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी गुरुवारी केले. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नक्षल विरोधी अभियान व अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्रातर्फे सुराबर्डी नागपूर येथील अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित नक्षल विरोधी प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शमशेर सिंग, पोलीस उपअधीक्षक राजन पाली आणि नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस उपअधीक्षक संजीव म्हैसेकर प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या नक्षल सेलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस महानिरीक्षक कदम म्हणाले, दुर्गम भागातील तरुण पिढीने नक्षलवादाला नाकारले आहे. नक्षल चळवळीत भ्रमनिरास झाल्याने बरेच नक्षलवादी आत्मसमर्पण करू लागले आहेत. आदिवासी बांधवही नक्षलवाद्यांच्य पाठीशी राहिलेले नाही. त्यामुळे नक्षल्यांनी तरुण पिढीला चळवळीत भरती करण्यासाठी सध्या शहरी मार्ग चोखाळण्यास सुरुवात केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक डी. एन. ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे, मनोज बहुरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक रूपनारायण, सुजीत पांडे यांच्यासह राज्यातील नक्षल सेलमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शहरी नक्षल संघटनांपासून सावध व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 3:19 AM