लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५ फेब्रुवारीपासून विद्यापीठांमधील विभाग व महाविद्यालयांतील वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे. यासंदर्भात स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा असल्याने सर्वांचे लक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे लागले आहे. परंतु विद्यापीठाने यासंदर्भात अद्यापही कुठलेही दिशानिर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू होणार की नाही, असा सवाल महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.
‘कोरोना’मुळे मार्च २०२० पासून महाविद्यालयांना ‘ब्रेक’ लागला. आता स्थिती नियंत्रणात येत असताना ‘कोरोना’ नियमावलींचे पालन करून वर्गात शिकवणीसाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले. महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करताना आपत्ती प्राधिकरण व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांची परवानगी अनिवार्य असणार आहे. वर्गात आळीपाळीने विद्यार्थी बोलावले जातील. वर्गात गर्दी होणार नाही, याची काळजी प्राचार्य, प्राध्यापकांना घ्यावी लागेल, अशा सूचनादेखील दिल्या.
यासंदर्भात नागपूर विद्यापीठानेदेखील दिशानिर्देश जारी करणे आवश्यक होते. मंगळवारी झालेल्या विद्वत्त परिषदेच्या बैठकीत यावर चर्चादेखील झाली व १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा सूरदेखील दिसून आला. मात्र प्रत्यक्षात अद्यापही अधिकृतपणे कुठलीही सूचना महाविद्यालयांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून सातत्याने महाविद्यालयांना विचारणा करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याकडेच काही माहिती नसल्याने संभ्रम वाढत असल्याचे दिसून येत आहे.
तयारी करायला वेळ हवा
विद्यापीठाने अद्यापही काहीही सूचना दिलेली नाही. जर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करायची असतील तर विद्यार्थी, शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक राहणार आहे. शिवाय वेळापत्रक निश्चित करणे यासारख्या बाबीदेखील निश्चित कराव्या लागणार आहेत. विद्यापीठाकडून नेहमीची लेटलतिफी कधी संपणार, असा प्रश्न एका प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला.
स्थानिक परिस्थितीवर निर्णय घेणार का?
राज्यात नागपुरातील ‘कोरोना’ रुग्णांची स्थिती अद्यापही हवी तशी आटोक्यात आलेली नाही. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू होणार की १५ फेब्रुवारीपासून वर्गांची पहिली घंटा वाजणार याबाबत व्यवस्थापनांकडेदेखील उत्तर नाही. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.