नागपूर : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ अशी पाच वर्षे राबविली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातील संत्रा हे प्रमुख उत्पादन लक्षात घेऊन या पिकासह अन्य पिकांवरील प्रक्रिया उद्योगासाठी कृषी विभागाने ही योजना मागील वर्षीपासून हाती घेतली आहे.
या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात यासाठी आतापर्यंत ऑनलाईन ६० अर्ज आले. यातील ३२ सादर झाले असून, २८ अर्ज ड्राॅपमध्ये आहेत. त्रुटीमुळे शेतकऱ्यांकडे पेंडिंग असलेले सात, संसाधन व्यक्तींकडून शिफारस न झालेले चार आहेत. पात्रतेच्या निकषावरून आतापर्यंत २० अर्ज कर्ज प्रकियेसाठी पात्र ठरले आहेत.
...
तालुकानिहाय उद्दिष्ट किती?
तालुका - लाभार्थी
नागपूर - १७
हिंगणा - १७
कामठी - १७
कळमेश्वर - १७
काटोल - १७
नरखेड - १७
रामटेक - १२
मौदा - १२
पारशिवनी - १२
उमरेड - १७
भिवापूर - ११
कुही - १२
एकूण - १९५
....
कुणाला घेता येणार लाभ?
यात प्रामुख्याने प्राथमिक प्रकिया उद्योगांना लाभ घेता येणार आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, शेतकरी, संयुक्त उत्तरदायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी उद्योजक यांना लाभ घेता येणार आहे. तसेच, सर्व अनुसूचित व्यावसायिक बँका, अनुसूचित सहकारी संस्था, लघु वित्त बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आदींना कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभाग यांच्यासोबत सामंजस्य करार स्वाक्षरी करून लाभ घेता येऊ शकतो.
....
असा करा अर्ज
या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन (पीएमएफईएम पोर्टलवर) अर्ज सादर करायचे आहेत. त्यासाठी संकेतस्थळ देण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी संसाधन व्यक्तींची नियुक्ती करून त्यांचे संपर्क क्रमांकही जिल्हा कृषी विभागाने एका पत्रकातून जाहीर केले आहे. तर, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी स्वयंसहायता गट, सहकारी उत्पादक यांनी जिल्हा कृषी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेेत.
....
कोट
जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी निवडण्यासाठी सात संसाधन व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक कार्यालयाने जाहीर केले आहेत. या निवड समितीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
- मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर.