नागपूर : हुडकेश्वर खुर्द येथील स्वराजनगर परिसरात गुरुवारी रात्री एक अस्वल भटकताना आढळून आले. त्याला पाहून काही तरुणही त्याचा पाठलाग करीत दगडफेक करू लागले. ही घटना रात्री११.३० वाजेदरम्यान घडली.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आऊटर रिंग रोडवरील किंग्स हॉटेलच्या मागे एक अस्वल भटकत होते. त्याला पाहून श्वानांची टोळी जोरजाेरात भुंकू लागली. त्यामुळे नागरिकांचे लक्ष गेले. परिसरात अस्वल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. काही महिलांनी मोबाइलवर अस्वलाचा व्हिडिओ तयार केला.
हा व्हिडिओ वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीच्या पथकालाही पाठविण्यात आला. त्यानंतर सोसायटीचे वॉलिंटियर केतन देशमुख, अंकित खलोडे, आकाश केशेट्टीवार, नितीश भांदककर आदींचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची पुष्टी होताच वन विभागाच्या पथकाला सूचना दिली, तसेच अस्वलाला दगड मारणाऱ्यांना समजावले. काही वेळानंतर अस्वल पिपळा फाटाच्या झुडपाकडे निघून गेले. रात्री दीड वाजता तो आणखी पुढे निघून गेले. रेस्क्यू पथक शुक्रवारी पहाटे परिसरावर लक्ष ठेवून होते. अस्वल जंगलाकडे परत गेल्याची शक्यता दिसून आल्यानंतर रेस्क्यू पथक परतले.
नेहमीच भटकत येतात वन्यप्राणी
या आउटर रिंगरोडला लागून मोठ्या प्रमाणावर झुडपी जंगल आहे. या परिसरातून थोड्याच अंतरावर उमरेड व बुटीबोरी जंगल आहे. अशा परिस्थितीत तेथून नेहमीच वन्यप्राणी भटकत येत असतात. यासोबतच मटकाझरी, झरी, कालडोंगरी, बनवारी, वडद, जुनापाणी येथील झुडपी जंगल जवळच आहे. त्यामुळे या क्षेत्रातून अस्वल भटकत आले असण्याची शक्यता आहे.