लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : न्यायप्रविष्ट असलेल्या घराच्या जागेवरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि भांडणाला सुरुवात झाली. याच भांडणात जबर मारहाण करण्यात आल्याने एक जण तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना कामठी शहरात गुरुवारी (दि. १६) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी तिघांना अटक केली आहे. आराेपींमध्ये एका माजी नगरसेविकेचाही समावेश आहे.
मोहम्मद शरीक अन्सारी (४२, रा. मोदी पडाव, कामठी) असे जखमीचे नाव असून, अटकेतील आराेपींमध्ये सूर्यकांत गुलाब महादुले (२५), प्रकाश गुलाब महादुले (२१) दाेघेही रा. लाला ओळ, कामठी यांच्यासह भीमनगर कामठी येथे राहणाऱ्या ५७ वर्षीय माजी नगरसेविकेचा समावेश आहे. रिता मोहम्मद शरीक अन्सारी (३८) या राहात असलेल्या घराचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या घराच्या खरेदी विक्रीची कागदपत्रे आपल्याकडे आहे, असा दावा करीत माजी नगरसेविकेने त्या घराचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न केला.
तिने मोहम्मद शरीक अन्सारी यांनी घर त्वरित खाली करण्याची सूचना केली. मात्र, कौतुका बन्सोड यांनी या घराचा ताबा आपल्याला दिला असल्याचे सांगत मोहम्मद शरीक अन्सारी यांनी घर खाली करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. सूर्यकांतने लाकडी दांड्याने तर प्रकाशने लाथाबुक्क्यांनी मोहम्मद शरीक अन्सारीला जबर मारहाण केली. यात त्यांच्या डाेळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ३२६, ३२३, ५०४, १४३, १४७, १४९ अन्वये गुन्हा दाखल करून तिन्ही आराेपींना अटक केली. त्यांच्याकडून मालवाहू वाहन, लाकडी दांडा व कपडे जप्त करण्यात आले, अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक नितीन मदनकर यांनी दिली.
...
घराचे प्रकरण न्यायप्रविष्ट
वादग्रस्त घर आपण खरेदी केल्याचा दावा माजी नगरसेविकेने केला असून, या घराचा ताबा काैतुका बन्साेड यांनी आपल्याला दिला असल्याचा दावा मोहम्मद शरीक अन्सारी यांनी केला या घर व जागेच्या विक्रीचा करार सुनील यादव व विश्वजित वासनिक यांच्याशी आधीच केला असल्याने प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. या मारहाण प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने आराेपींना दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती ठाणेदार राहुल शिरे यांनी दिली.