कुही : वेलतूर येथे एका शेतकऱ्याच्या शेती खरेदी-विक्री प्रकरणावरून एका युवकास एपीआय किशोर वैरागडे यांनी काहीही कारण नसताना अमानुषपणे मारहाण केली. या घटनेची तक्रार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे करण्यात आली आहे. पिपरी मुंजे येथील प्रवीण सोमाजी रामटेके (३२) हा युवक वेलतूर येथे वेल्डिंगचा व्यवसाय करतो. कुठलेही कारण नसताना १६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एपीआय किशोर वैरागडे पाच-सहा पोलीस कर्मचारी व व्हॅन घेऊन प्रवीण किरायाने राहत असलेल्या माणिक डोंगरे यांच्या घरी आले. तिथे त्याला मारहाण केली. याशिवाय पोलीस व्हॅनमध्ये बसवून ५ कि.मी. अंतरावरील शिकारपूर येथे नेले. यावेळी घरमालकाचा मुलगा नरेंद्र डोंगरे यालाही सोबत नेले होते. शिकारपूर येथे प्रकाश चौधरी यांच्या घरासमोर नेऊन सर्व गावकऱ्यांसमक्ष एपीआय वैरागडे यांनी जातिवाचक शिव्या देऊन लाकडी दांड्याने मारहाण केली, असा आरोप प्रवीण रामटेके यांनी केला आहे. ही मारहाण एका शेतीच्या खरेदी-विक्री प्रकरणात कमिशनपोटी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत रामटेके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. यासंबंधात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे कळते. यासंबंधात उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांना विचारणा केली असता संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतीच्या व्यवहारात युवकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:08 AM