गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यभरात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत विभाग व राज्यस्तरावरील प्रथम तीन विजेत्या शाळांना पुरस्काराचे वितरण आचारसंहितेपूर्वीच करण्यात आले. दरम्यान आचार संहिता लागू झाल्याने जिल्हा व तालुकास्तरावरील शाळांचे बक्षीस वितरण अद्यापही रखडलेले आहे. सुरुवातीला विजेत्या शाळांसाठी आवश्यक पुरस्काराची रक्कमच शासन पातळीवरून जिल्हा स्तरावर प्राप्त झाली नव्हती. मात्र, आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हास्तरावर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर व्यवस्थापनाच्या अशा २८ शाळांसाठी १ कोटी ९४ लाख रुपयाची बक्षिसाची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती आहे.परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे बक्षीस वितरण तूर्त रखडले आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत तालुकास्तरावर शासकीय-स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारे ग्रामीण भागातून २६ शाळांची निवड पहिल्या क्रमांकासाठी झाली असून, या शाळांना प्रत्येकी ३ लाखाचे बक्षीस मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी दोन आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना एक लाखाचे पारितोषिक वितरित होणार असल्याचे सांगण्यात येते. या अभियानात नागपूर विभागातून जिल्ह्यातील जि.प.च्या नरखेड तालुक्यातील थुगाव निपानी शाळेने पहिला क्रमांक पटकाविला असून, या शाळेला बक्षिसाचेही वितरण झाले आहे. याच शाळेने जिल्ह्यातूनही प्रथम क्रमांक पटकाविला आहे, हे विशेष. सदर अभियानांतर्गत जिल्हास्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि इतर व्यवस्थापनाच्या अशा दोन प्रथम येणाऱ्या शाळांना प्रत्येकी ११ लाखाचे तर द्वितीय क्रमांकाच्या शाळेला प्रत्येकी पाच आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेला ३ लाखाचे बक्षीस आहे.