नागपूर : हिऱ्याचे माणसाला कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचा, कलात्मकतेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे. आधीच मोहक असलेल्या हिऱ्याला पैलू पाडून हिऱ्याचे कलात्मक दागिने तयार केले, तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही. लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नावीन्यपूर्ण असे हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आहे. स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांचे ‘इंट्रिया’ हे प्रदर्शन शनिवारपासून लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू झाले. (Inauguration of the Intria Exhibition)
सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारे दागिने ही ‘इंट्रिया’ची खास ओळख. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी यांच्या कल्पना-कौशल्यातून आविष्कृत झालेल्या दागिन्यांचे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता न्यू इरा हॉस्पिटलचे संचालक डॉ.आनंद संचेती आणि डॉ.अर्चना संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, इंट्रियाच्या संचालक आणि सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी आणि लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन प्रामुख्याने उपस्थित होते.
या समारंभात आरसी प्लास्टो टँक्स अँड पाइप्स प्रा.लि.चे संचालक नीलेश अग्रवाल, अरुण ऑटोचे संचालक अरुण पाटणी व विजय पाटणी, दीपक देवसिंघानी, किरण दर्डा, माधुरी बोरा, शैला गांधी, श्रद्धा सिंग, चंचल शर्मा, अनिता दर्डा, निकेता दर्डा, ऋतू जैन, रिचा बोरा, शिखा शर्मा, सेजल कामदार, आकांशा अटल, साकेत मुंधडा, ॲड.तुषार दर्डा, डॉ.संजय दर्डा, ॲड.रमेश दर्डा, सुनीत कोठारी, डॉ.रवींद्र गांधी, प्रेम लुणावत, एल.एन. शर्मा, अजय सुराणा, पूजा पंचमतिया, कविता राठी, नंदिता चंचाणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव मुजीब पठाण, अंशुमन बघेल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
अत्यंत आगळेवेगळे असे हिऱ्यांचे सृजनात्मक कलात्मकतेचे दागिने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. त्यातील डिझाइन्स व अनोखे रचनाकौशल्य मनाला भावल्याखेरीज राहत नाही. अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रत्येक दागिन्यांच्या डिझाइन्सवर आणि त्याच्या कलाकुसरीवर हिऱ्यांच्या दागिन्यांवर प्रेम करणारे रसिक लुब्ध झाले. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात नवरात्र, दिवाळी आणि सणासुदीच्या मुहूर्तावर उत्कृष्ट कलात्मकतेसह संस्कृती आणि परंपरांचा अनोखा मेळ साधणाऱ्या डिझाइन्स प्रदर्शित करण्यात आल्यामुळे रसिकांची खास पसंती लाभली.
इंट्रियाचा प्रत्येक दागिना हा परवडणारा, स्टायलिश व ट्रेंडी : पूर्वा कोठारी
डिझायनर पूर्वा कोठारी यांनी सांगितले, दागिन्यांमुळे एकूण व्यक्तिमत्त्वाला एक निराळाच लुक येतो. इंट्रियाचा प्रत्येक दागिना हा स्टायलिश आणि ट्रेंडी असावा, याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव वैशिष्ट्ये लक्षात घेऊन, त्याची रचना करण्यात आली असून, प्रत्येकाला शोभेल असाच आहे. गेली दोन वर्षे कठीण होती. या वर्षी प्रदर्शित केलेले दागिने परवडणारे आणि सर्वोत्तम आहेत. अनेक स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत. प्रदर्शनात प्रत्येकासाठी काहीतरी आहेच.