पदाधिकारी मेळावा : रामदास आठवले यांचा दावानागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आ.) ज्यांच्यासोबत असते, त्या पक्षाची सत्ता येते. रिपाइंच्या मतामुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला यश मिळाल्याचा दावा पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी मंगळवारी केला. श्री साई सभागृहात आयोजित रिपाइंच्या विभागीय पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भीमराव बन्सोड तर प्रमुखवक्ते प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर उपस्थित होते. मी मंत्रिपदासाठी नव्हे तर समाजाला न्याय मिळावा म्हणून महायुतीत सहभागी झालो. झोपडपट्टीधारकांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे. यासाठी झोपडपट्टी संरक्षण कायदा अमलात आणावा. तसेच दलित महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी दलित महिला आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.राज्यातील विविध समाज घटकांना एकत्रित करून गाव तेथे रिपाइं शाखा सुरू करा. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन आठवले यांनी केले.प्रत्येक जिल्ह्यात २ ते ३ जागा मिळाव्या, अशी रिपाइंची मागणी आहे. सेना-भाजपने महायुतीत सन्मान ठेवला पाहिजे. आठवलेंना केंद्रात मंत्रिपद , राज्यात विधान परिषदेच्या ४ जागा तसेच सत्तेत १५ टक्के वाटा मिळावा, अशी मागणी भुपेश थुलकर यांनी केली. आठवले हेच महायुतीचे जनक असल्याने रिपाइंचा सन्मान झाला पाहिजे, असे मत भीमराव बन्सोड यांनी व्यक्त केले. रवी शेंडे, माजी आमदार अनिल गोंडाणे, सुधाकर तायडे, एल.के.मडावी, अनु दहेगावकर आदींनी मार्गदर्शन केले. राजु बहादुरे, दुर्वास चौधरी,आर.एस.वानखेडे, पवन गजभिये, अशोक मेश्राम, विकास गणवीर, सदा भोवते, अशोक घोटेकर, राजेश रामटेके, सरोज बहादुरे, विजय आगलावे, मेघराज घुटके आदी व्यासपीठावर होते. मेळाव्याला पूर्व विदर्भातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रिपाइंमुळेच सेना-भाजपला यश
By admin | Published: July 30, 2014 1:21 AM