पत्रकार व्हायचे होते, वकील झालो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:31 AM2018-02-15T00:31:12+5:302018-02-15T00:32:44+5:30
विधी क्षेत्रात भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ अधिवक्ता के. एच. देशपांडे यांनी बुधवारी प्रकट मुलाखतीमध्ये स्वत:बद्दल आश्चर्यकारक खुलासा केला. आपल्याला पत्रकार व्हायचे होते, पण त्यावेळच्या परिस्थितीने वकिली व्यवसायाकडे वळवले, अशी माहिती देशपांडे यांनी दिली. हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत ही मुलाखत घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधी क्षेत्रात भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ अधिवक्ता के. एच. देशपांडे यांनी बुधवारी प्रकट मुलाखतीमध्ये स्वत:बद्दल आश्चर्यकारक खुलासा केला. आपल्याला पत्रकार व्हायचे होते, पण त्यावेळच्या परिस्थितीने वकिली व्यवसायाकडे वळवले, अशी माहिती देशपांडे यांनी दिली. हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत ही मुलाखत घेण्यात आली.
देशपांडे यांनी मुलाखतीत आतापर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडला. त्यांनी १९५३ मध्ये विधी पदवी प्राप्त केली. परंतु, त्यांचा वकिली व्यवसायापेक्षा पत्रकारितेकडे जास्त कल होता. त्यांनी एका वर्तमानपत्रात नोकरीही स्वीकारली होती. दरम्यान, त्यांच्या वडिलांनी तत्कालीन गृहमंत्री डी. पी. मिश्रा यांच्यासोबत त्यांची भेट घालून दिली. मिश्रा यांनी त्यांना पत्रकारितेत काहीच पडले नसल्याचे सांगून वकिली करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते या क्षेत्राकडे वळले ते कायमचे.
देशपांडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यावेळच्या न्यायव्यवस्थेवर प्रकाश टाकला. त्या काळात कायद्यांची व गुन्ह्यांची संख्या कमी होती. त्यामुळे न्यायालयातही फार कमी प्रकरणे दाखल होत होती. परिणामी, प्रकरणावर एक वर्षात निकाल लागत होता. आता अनेक विशेष कायदे लागू झाले असून तुलनेने गुन्हेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. न्यायालयांवर प्रकरणांचा ताण असल्यामुळे वर्षानुवर्षे सुनावणी सुरू राहते असे सांगून देशपांडे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रलंबित प्रकरणाचे उदाहरण दिले.
पूर्वी वकिली व्यवसायाला दुय्यम स्थान होते. नोकरीला प्राधान्य दिले जात होते. परंतु, आता काळ बदलला आहे. वकिली व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. वकील चांगली कमाई करीत आहेत. त्यामुळे ठरवून वकील होणाºयांची संख्या वाढली आहे असेही देशपांडे यांनी सांगितले. अॅड. रेणुका सिरपूरकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. व्यासपीठावर स्टडी सर्कलचे अध्यक्ष अॅड. अविनाश गोरडे व असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते.