८९ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीची संमेलनासाठी युती राजेश पाणूरकर नागपूर पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा दोन वैदर्भीय साहित्यिक असल्याने रंगत वाढली होती. पण अखेरच्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ प्रा़ रवींद्र शोभणे यांनी कविवर्य विठ्ठल वाघ यांना पाठिंबा देत अर्ज मागे घेतला़ त्यामुळे वैदर्भीयांची मते आता कवी विठ्ठल वाघ यांना मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. कवी विठ्ठल वाघ एका ज्येष्ठ राजकीय नेत्याच्या जवळचे मानले जातात पण त्या नेत्याने दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा दिल्याने विठ्ठल वाघ अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे आता बोलले जात आहे. त्यात उमेदवार असणाऱ्या साहित्यिकांनी निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाशी संपर्कसत्र सुरू केल्याचीही बातमी आहे. विदर्भातून संमेलनाध्यपदासाठी वाघ आणि शोभणे यांनी अर्ज भरला होता. त्यात यापूर्वी विठ्ठल वाघ यांनी नाशिक येथील साहित्य संमेलनाची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि दलित साहित्यिकाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतला होता़ त्यामुळे यंदा विठ्ठल वाघ यांना समर्थन मिळावे आणि शोभणेंनी अर्ज मागे घ्यावा, याचे प्रयत्न साहित्य क्षेत्रातील मंडळींनी केले. त्याला अखेर यश आले. विठ्ठल वाघ यांनी काहीही झाले तरी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने निवडणूकीत काय होणार, याचे अंदाज बांधले जात होते. शोभणेंनाही मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांनीही निवडणूक लढण्याचीच भूमिका कायम ठेवली होती. विठ्ठल वाघ यांची लोकप्रियता आणि शोभणेंचे साहित्य क्षेत्रातले योगदान पाहता वैदर्भीयांमध्येच चुरस निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उघडपणे श्रीपाल सबनीस यांना पाठिंबा दर्शविल्यानंतर शोभणे यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आला. त्यात शोभणे यांना अर्ज मागे घेण्यासाठी मनोहर म्हैसाळकर यांनी विनंती केली. शरद पवार या निवडणुकीत रस घेत असल्याने शोभणे यांनी कवी विठ्ठल वाघ यांना पाठिंबा देत अर्ज मागे घेतला. त्यांच्यासोबतच चंद्रकुमार नलगे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात वाघांसोबत अरुण जाखडे, शरणकुमार निंबाळे, श्रीनिवास वाळुंजीकर व डॉ़ श्रीपाल सबनीस कायम आहेत़ यात विठ्ठल वाघ यांचे नाव जोरात सुरू आहे. ते शरद पवार यांचे निकवर्तीयही आहेत पण ऐनवेळी पवार यांनी सबनीस यांना पाठिंबा देऊन वाघांच्या डरकाळीला मर्यादा आणल्या आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी पवार यांचे सहकार्य विठ्ठल वाघ यांना अपेक्षित होते, असे वाघ यांचे समर्थक सांगत आहेत. पण पवारांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून झालेल्या वादंगात निर्माण झालेला धुराळा शांत करण्यासाठी सबनीस यांना समर्थन दिले, असे बोलले जात आहे. यासंदर्भात विठ्ठल वाघ यांनी मात्र आपण आपल्या संपर्काच्या आणि क्षमतेच्या, साहित्यसेवेच्या बळावरच ही निवडणूक लढवित असल्याचे जाहीर केले. वैदर्भीय साहित्यिकांनी मात्र वाघ यांना संमेलनाध्यक्ष करण्यासाठी कंबर कसली. त्यात शोभणे यांनी माघार घ्यावी, हा प्रयत्न यशस्वी झाला. पण मराठवाडा साहित्य परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारिणी शरद पवारांच्या कृपेमुळे निवडून आल्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेने श्रीपाल सबनीस यांनाच समर्थन दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक वाघ आणि सबनीस अशीच होण्याची शक्यता आहे. संमेलनासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी युती पिंपरी चिंचवड संमेलनाचे आयोजक डी. वाय. पाटील काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संमेलनात रस दाखविल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची संमेलनासाठी युती झाली असून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पवारसाहेबांना हवा असणारा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात पवारसाहेबांच्या आशीर्वादाशिवाय संमेलनाध्यक्ष होण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता काही उमेदवारांनी थेट पवार साहेबांशी संपर्क साधल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्ष राजकीय पाठिंब्यावर येणार की कर्तृत्वावर हे काळच सांगेल.
संमेलनाध्यक्ष होण्यासाठी ‘पॉवरफुल्ल’ नेत्यांना गळ
By admin | Published: September 11, 2015 3:28 AM