नागपूर : इंधन, गॅस सिलिंडरची दरवाढ व महागाईच्या विरोधात प्रदेश महिला काँग्रेसने शुक्रवारी नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत केंद्र सरकारचा निषेध केला. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चुली पेटवून त्यावर पोळ्या शेकल्या.
महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात नागपूर शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, जिल्हाध्यक्ष तक्षशीला वाघधरे यांच्यासह महिला पदाधिकारी सहभागी झाल्या. महिला कार्यकर्त्यांनी गॅस शेगडी ठेवून त्याचा पाईप गटारात सोडला होता. तर खाद्य तेल महाग झाल्यामुळे पाण्यात भाजी शिजवली. सिलिंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली. हे आंदोलन लक्षवेधी ठरले.
केंद्र सरकारने कृत्रिम इंधन दरवाढ केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. महिलांना घर चालविणे कठीण झाले आहे. केंद्राच्या या धोरणाविरोधात देशातील महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संध्या सव्वालाखे यांनी या वेळी दिला. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात कांता पराते, वैशाली मानवटकर, रिचा जैन, संगीता उपरीक, बेबी गौरीकर आदींनी सहभाग घेतला.