नागपूर : देशात महाराष्ट्र वगळता सर्वच राज्यांमध्ये कोचिंग क्लासेस सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात अनलॉकमध्ये गर्दीचे ठिकाण बीअर बार, हॉटेल, मॉल्स, मंदिर उघडण्यास शासनाने परवानगी दिली, पण विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या कोचिंग क्लासेसला अद्यापही परवानगी का दिली नाही, असा सवाल करीत असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूटने अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे संपूर्ण राज्यातील कोचिंग क्लासेस तात्काळ सुरू करण्याची मागणी राज्य शासनाकडे शनिवारी एका पत्रपरिषदेत केली.
असोसिएशनचे अध्यक्ष रजनीकांत बोंद्रे म्हणाले, कोरोना महामारीमुळे कोचिंग क्लासेसची स्थिती खराब आहे. क्लासेसशी जुळलेले शिक्षक आणि अन्य लोकांचे रोजगार हिरावले आहेत. क्लासेस बंद असल्याने राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. विविध परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करण्याची गरज असून, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती निश्चित होणार आहे. आता विद्यार्थ्यांना शिक्षकांना आमोरासमोर पाहायचे आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर क्लासेस सुरू करण्यासाठी राज्यस्तरावरील विविध संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह १६ मंत्र्यांना निवेदने दिली आहेत. नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यानंतरही क्लासेस सुरू न होणे हे शुभदायक नाही. विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन केल्यास त्यांचे निकाल नक्कीच सर्वोत्कृष्ट येतील. इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळांना परवानगी दिली, त्याचप्रमाणे राज्य शासनाने कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बोंद्रे यांनी केली.
बोंद्रे म्हणाले, नागपुरात लहान-मोठे ८०० पेक्षा जास्त कोचिंग क्लासेस आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ही संख्या दीड लाख असून, त्यावर १५ लाख लोकांचा प्रत्यक्ष आणि ७५ लाख लोकांचा अप्रत्यक्ष रोजगार अवलंबून आहे. नागपुरात ४० टक्के विद्यार्थी अन्य जिल्हा आणि राज्यातून येतात. बंदमुळे अकॅडमिकवर परिणाम होणार आहे. सरकार कोचिंग क्लासेसला त्रास देण्यासाठी हे जाणीवपूर्वक करीत आहे. क्लासेस लवकर सुरू न झाल्यास आमच्यासमोर आंदोलन आणि कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे बोंद्रे यांनी स्पष्ट केले.
पाणिनी तेलंग म्हणाले, शासनाने विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा केल्याने ऑफलाईन कोचिंग वर्ग उघडणे आवश्यक आहे. कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यास संचालक तयार आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे क्लासेस सुरू करण्याची नितांत गरज आहे. याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा. पत्रपरिषदेत असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. समीर फाळे, सहसचिव विराग मिटकरी, जगदीश अग्रवाल उपस्थित होते.