()
शहरातील चौकाचौकात दिसतेय विदारकता : बालकांच्या हक्क, अधिकाराचे कायद्यांची अंमलबजावणी नाही
नागपूर : चौकातील लाल सिग्नल लागला की लहानलहान मळलेल्या कपड्यातील मुले मुली वाहनचालकांपुढे भिकेसाठी हात पसरून उभे असतात. कुणी वाहन चालकांच्या पाया लागतो तर कुणी गाड्या पुसत पैशाची मागणी करतो. भिक मागणारी बालके शहरातील काही महत्वाच्या चौकात नियमित आढळतात. पाटी-पेन्सिल धरणारे हात उघडपणे भिक मागताना बघून यांना थांबविणारी यंत्रणा गेली कुठे? बालकांचे हक्क, अधिकार कायद्याची का अंमलबजावणी होत नाही, असा प्रश्न हे दृश्य बघून अनेकांना पडतो.
काही चौकात भिक मागणारी मुले ही विशिष्ट समाजाची आहेत. काही चौकात आढळणारी मुले ही परराज्यातून आलेली आहे. सीताबर्डीच्या उड्डाणपुलाखाली पारधी समाजातील काही लोकांचा दिवसभर ठिय्या असतो. मोठी माणसे नशा करून झोपलेली असतात आणि लहान मुले ही सिग्नल थांबला की रस्त्यावर येऊन वाहनचालकांकडून भिक मागत असतात. परराज्यातून आलेली काही कुटुंब सीए रोडवरील चौकात, रिझर्व्ह बँक चौक, उंटखाना चौक, पागलखाना चौक अशा अनेक ठिकाणी वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील मोठी माणसं मुलांच्या खेळाचे साहित्य व अन्य वस्तूंची विक्री करतात. त्यांची लहान मुलेही कधीकधी साहित्य विकतात तर काही मुले चौकात वाहने थांबल्यावर भिक मागतात.
- पंचशील चौक
सीताबर्डी उड्डाणपुलाखालील पंचशील चौकात सकाळी ११ वाजतापासून पारधी समाजातील काही लोकं टोळक्यांनी बसलेली असतात. यातील महिला व पुरुष नशा करून असतात. बरेचदा ते एकमेकांशी भांडतानाही दिसतात. त्यांची लहान मुले ही रस्त्यावर वाहन थांबले की भिक मागतात. रात्री ही सर्व मंडळी यशवंत स्टेडियमच्या जवळ वास्तव्यास असतात. नशा करणे, भिक मागणे हीच त्यांची कामे.
- अशोक चौक
परराज्यातून आलेली काही कुटुंब शहरातील विविध भागात वास्तव्यास आहेत. यातील काही कुटुंब अशोक चौकात वास्तव्यास आढळली. या कुटुंबातील महिला व पुरुष चौकांमध्येच साहित्याची विक्री करीत होते. तर लहान मुले चौकांमध्ये भिक मागत होते.
- परराज्यातून नागपुरात आलेली ही कुटुंब उघड्यावर राहतात, भिक मागतात. ती का येतात याची कारणे शोधली पाहिजे. रोजगार हमीचा कायदा अख्ख्या देशात लागू आहे. त्यांना त्या राज्यात योजनेचा लाभ का दिला जात नाही. पावसाळ्यात उघड्यावर राहणारी ही लोकं ज्या राज्यातून आली आहेत, तेथे त्यांचे घरदार नाही. त्यांच्याकडे रोजगाराचे साधन नाही. ही सर्व अधांतरी लोक आहे. त्यामुळे बालगृह हा पर्याय नाही. त्या त्या राज्यांनी त्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजे. या लोकांचे सामाजिक प्रश्न आहे. त्यांचे जगण्याचे प्रश्न आहे. ते सोडविणे गरजेचे आहे.
दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्ष वाहिनी
- बालकांचे हक्क, त्यांचे अधिकार यासंदर्भातील कायदे आहेत. बालकांच्या काळजी, संरक्षण आणि संगोपनाच्या बाबतीतही कायद्यात तरतुदी आहे. पोलीस, शिक्षण, महिला व बाल कल्याण, कामगार या विभागाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. परंतु या विभागांमध्ये समन्वय नाही. कुणी चांगले काही सुचविले तर प्रशासनाचे अधिकारी त्याला प्रतिसाद देत नाही. यंत्रणा असतानाही या बालकांसाठी काम होत नसल्याने रस्त्यावरची मुले रस्त्यावरच राहतात.
प्रसन्नजित गायकवाड, बालरक्षक