मेहा शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील चौकाचौकांमध्ये दिसणारे भिक्षेकरी ही एक समस्याच झाली असून नागरिकांना यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. या भिक्षेकऱ्यांना निवारागृहात हलविण्यासाठी मनपातर्फे पुढाकार घेण्यात येणार आहे. यासाठी जास्त लोक सामावू शकतील अशा निवारागृहाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे यासंदर्भात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मांडली आहे.
शहरातील पंचशील चौक, आरबीआय चौक, शंकरनगर चौक, अशोक चौक, यासारख्या भागांमध्ये भिक्षेकरी मोठ्या संख्येने दिसून येतात. त्यांच्यात लहान मुलेदेखील असतात व त्यामुळे अपघाताचीदेखील भीती असते. पैशांसाठी हे भिक्षेकरी अनेकदा त्रासदेखील देतात. यामुळे अनेक जण त्रासले आहेत. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना विचारणा केली असता या स्थितीचा मी स्वत: आढावा घेणार आहे. योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. चौकांजवळ अशाप्रकारे लोक एकत्रित जमणे अयोग्यच आहे. याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या भिक्षेकऱ्यांना निवारागृहात हलविण्याचा विचार सुरू आहे. सद्यस्थितीत असलेल्या निवारागृहात मर्यादित संख्येतच लोक राहू शकतात. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसाठी मोठ्या निवारागृहाची व्यवस्था केली जात आहे, असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.
इंदोरा येथे पुरुषांसाठी ५० खाटांचे तर सीताबर्डीत महिलांसाठी २५ खाटांचे निवारागृह आहे. आम्ही कुटुंबांसाठी एक निवारागृह उघडण्याचा प्रयत्न करत आहोत. या निवारागृहात भिक्षेकऱ्यांना कौशल्याधिष्ठित प्रकल्पांचे प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. शिवाय मुलांनादेखील शिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण झाल्यावर मूळ गावी परतणे किंवा निवारागृहात राहून काम करण्याचा पर्याय त्यांना देण्यात येईल. पुढील महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती भिक्षेकऱ्यांसाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था चालविणाऱ्या अधिवक्ता साक्षी क्षीरसागर यांनी दिली.