सावरगाव : आराेग्य विभागाच्या विशेष माेहिमेंतर्गत नरखेड तालुक्यातील शून्य ते सहा वर्षे वयाेगटातील सर्व बालकांच्या आराेग्य तपासणीला रविवार (दि. २२) पासून सुरुवात करण्यात आली आहे. ही तपासणी तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आराेग्य उपकेंद्र व अंगणवाड्यांमध्ये माेफत केली जात असून, आजारी व कुपाेषित बालकांवर तातडीने औषधाेपचार केले जात आहेत.
तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. विद्यानंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनात राबविल्या जात असलेल्या या विशेष माेहिमेंतर्गत शून्य ते सहा वर्षे वयाेगटातील सर्व बालकांच्या आराेग्याची तपासणी करीत त्यांची तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित, दुर्धर आजारी बालके अशी वर्गवारी केली जात असून, गरोदर मातांच्याही आराेग्याची तपासणी केली जात आहे. यात सर्वांची सिकलसेल, हिमोग्लोबिन, वजनाची तपासणी करून गरजूंवर तातडीने औषधाेपचार केले जात असल्याची माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. विद्यानंद गायकवाड यांनी दिली. नागरिकांनी आपापल्या बालकांची तपासणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. या माेहिमेत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आशा गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या आहेत.