लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थर्टी फर्स्टच्या रात्री उशिरापर्यंत जोश आणि उत्साहात जल्लोष करीत नवीन वर्षाला आलिंगन देण्यात आले पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र नागपूरकरांनी आपल्या आराध्य दैवताच्या प्रार्थनेने केली. नवीन वर्ष सुखसमृद्धीचे, भरभराटीचे जावो, या मनोकामनेसह भाविकांनी दिवसाचा शुभारंभ केला. ट्वेंटी-ट्वेंटीच्या पहिल्या दिवशी सकाळपासून प्रार्थनास्थळांमध्ये लोकांनी गर्दी केली.टेकडी गणेश मंदिर, वर्धा रोडवरील साई मंदिर, कोराडीतील जगदंबा महालक्ष्मी मंदिर, अदासा येथील हनुमान मंदिर, आग्याराम देवी मंदिर, महालचे कल्याणेश्वर मंदिर, त्रिमूर्तीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिर आदी मंदिरांमध्ये भाविकांनी पूजा केली. मोठा ताजबाग, छोटा ताजबाग, मोमीनपुऱ्यातील जामा मशिदीमध्येही इबादत करून नववर्षाची सुरुवात करण्यात आली. दीक्षाभूमीवरही बौद्ध अनुयायांनी नववर्षाचे स्वागत करीत अभिवादनासाठी सकाळपासून गर्दी केली होती. बौद्ध विहारांमध्येही वंदना करण्यात आली. रामदासपेठ व कामठी रोडवरील गुरुद्वारांमध्ये शीख बांधवांनी माथा टेकला. ख्रिश्चन बांधवांनीही शहरातील प्रमुख चर्चेसमध्ये प्रार्थना करीत नववर्षाची सुरुवात केली. सकाळी विविध धार्मिक स्थळी प्रार्थना केल्यानंतर नागरिकांनी उद्यानांची वाट धरली होती. महाराज बाग, अंबाझरीसह शहरातील प्रमुख उद्याने बुधवारी फुल्ल झाली होती. नेहमीचे ताणतणाव, कामाची धावपळ विसरून नवीन वर्षाचा पहिला दिवस कुटुंबासमवेत आनंदाने, उत्साहाने साजरा करण्याचा करण्याचा प्रयत्न नागपूरकरांनी केला. एकूणच नागपूरकरांचा नववर्षाचा पहिला दिवस मंगलमय आणि उत्साहात गेल्याचे दिसून आले. मध्येमध्ये हजेरी लावणाऱ्या पावसाने काहिसे सेलिब्रेशन वर विरजण पाडले व धावपळ मात्र वाढविली होती.टेकडी गणेश, साई मंदिरात रांग नागपूरकरांचे आराध्य असलेल्या टेकडी गणेश मंदिरात बुधवारी भाविकांची रीघ लागली होती. भाविकांनी श्रीगणेशाचे पूजन करून नववर्षाची सुरुवात केली. मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. नागरिकांनी सायंकाळपर्यंत टेकडी मंदिरात येउन दर्शन घेतले आणि बाप्पाला सुख, समृद्धी व भरभराटीचा आशीर्वाद मागितला. अबालवृद्धासह महिला व तरुणांची संख्याही यात मोठी होती. टेकडी मंदिरासह वर्धा रोडवरील साई मंदिरातही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच येथे भाविकांनी मोठी गर्दी केली. साईबाबाला गुरुस्थानी मानले जाते. त्यामुळे गुरुपूजनाने भाविकांनी नववर्षाची सुरुवात केली. नववर्षात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली होती.भाविकांची कोराडी मंदिरात गर्दी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे. याचा अनुभव आज कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरातही आला. जगदंबेच्या दर्शनासाठी कोराडी येथे आज भाविकांनी प्रचंड गर्दी करून जगदंबेच्या आशीर्वादाने नवी सुरुवात केली. दर्शनासाठी झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोराडी जगदंबा देवी संस्थानने भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ सुरक्षा रक्षक तैनात केले होते. तसेच पोलीस स्टेशन कोराडीतर्फे पोलिसांचा बंदोबस्त लावला गेला. जगदंबेच्या दर्शनासाठी पहाटे ५ वाजेपासूनच सुरू झालेली भाविकांची गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती.मोठा ताजबागमध्ये चढविल्या चादरमोठा ताजबाग येथे ताजुद्दीन बाबा औलिया यांच्या दरगाहवर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांनी नव्या वर्षाचा संकल्प करीत मजारवर चादर चढविली. सकाळपासूनच हा सिलसिला सुरू झाला होता. याशिवाय छोटा ताजबाग आणि सिव्हिल लाईन्स येथील ताजुद्दीन बाबाच्या दरगाह येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी इबादत करण्यात आली. भाविकांनी सुदृढ आरोग्य, सौहार्द व समृद्धीची मनोकामना केली.दीक्षाभूमीला अभिवादननववर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर पोहचून तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दीक्षाभूमीवर सकाळपासून अनुयायांची गर्दी वाढली होती. विशेष म्हणजे नववर्ष आणि भीमा कोरेगाव शौर्यदिन असा दुहेरी योग अनुयायांनी अभिवादनाने साजरा केला. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.पर्यटन स्थळांवर नववर्षाच्या स्वागताचा जल्लोषनवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकांनी आज शहरापासून फार जवळ असलेल्या मोहगाव झिल्पी, खेकरानाला, वाकी, रामटेक, खिंडसी, कोरंबी, पेंच या पर्यटन स्थळांवर जाण्याचा बेत आखला होता. महिलांचा यात मोठा सहभाग होता. महिलांचा ग्रुप पर्यटन स्थळावर जेवणाचे डबे घेऊन आले होते. काही मोठ्या ग्रुपने तर स्वयंपाकही तिथेच केला. विविध खेळ, गाण्याच्या भेंड्या, उखाण्याची स्पर्धा रंगलेली येथे बघायला मिळाली. काहींनी म्युझिक सिस्टमही आणले होते. नवीन गाण्यांवर चांगलाच ठेका धरला होता. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्त झालेल्या वन डे पिकनिकचा भरभरून आनंद महिलांनी लुटला. त्याचबरोबर तरुण-तरुणींचे टोळके, काही कपल्सनीसुद्धा नव्या वर्षाचा पहिला दिवस या पर्यटन स्थळांवर घालविला, भरभरून आनंद लुटला.
नागपुरात प्रार्थनेने नववर्षाची सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 12:00 AM
थर्टी फर्स्टच्या रात्री उशिरापर्यंत जोश आणि उत्साहात जल्लोष करीत नवीन वर्षाला आलिंगन देण्यात आले पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र नागपूरकरांनी आपल्या आराध्य दैवताच्या प्रार्थनेने केली.
ठळक मुद्देमंदिर, मशीद, विहार, चर्च, गुरुद्वारांमध्ये गर्दी : नवीन काही करण्याचा संकल्प