बुद्ध जयंती महोत्सव : बालचंद्र खांडेकर यांचा इशारानागपूर : भारतात अडीच हजार वर्षांनंतर बौद्ध धम्म प्रस्थापित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला शह देण्यासाठी देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात झाली आहे, असा इशारा बौद्ध-आंबेडकरी विचारवंत डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी दीक्षाभूमी येथे दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त दीक्षाभूमी येथे बुद्ध जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रविवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बुद्ध धम्म’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावर डॉ. खांडेकर बोलत होते. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, माजी सनदी अधिकारी नानक रामटेके, प्रा. देवीदास घोडेस्वार वक्ते होते. स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे, विजय चिकाटे आणि विलास गजघाटे व्यासपीठावर होते. डॉ. बालचंद्र खांडेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे. या देशात तथागत गौतम बुद्धाने वेद, यज्ञ आणि वर्णव्यवस्थेला नाकारून समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूत्वावर आधारलेली क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे भारत जगात ओळखला गेला. भारतात सोन्याचा धूर निघायचा असे सांगितले जाते. तो काळ म्हणजेच बुद्धाचा काळ होता. परंतु प्रस्थापित व्यवस्थेने प्रतिक्रांती करीत या देशातून बौद्ध धम्म हद्दपार केला. बौद्ध तत्त्वज्ञान गाडून टाकले. परिणामी हा देश हजारो वर्षे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीत अडकून राहिला. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल अडीच हजार वर्षानंतर या देशात बौद्ध धम्म पुनर्स्थापित क्रांती केली. देशाची मुद्रा, राष्ट्रपती भवन, राष्ट्रध्वज इतकेच नव्हे तर भारतीय राज्यघटनेतही बुद्धाचे तत्त्वज्ञान दिसून येते. यामुळे प्रस्थापित व्यवस्था पुन्हा अस्वस्थ झाली. ते ही व्यवस्था उलथवण्याचा सातत्याने प्रयत्नात होती. ती संधी त्यांना आता मिळाली आहे. त्यामुळे यापासून सावध राहावे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्यावेळी त्रिशरण पंचशीलेसोबत ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या, त्या भविष्यातील हा धोका ओळखूनच जाणीवपूर्व दिल्या होत्या. हे समजून घेण्याची गरज आहे. तेव्हा या २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. भाऊ लोखंडे, नानक रामटेके व जितेंद्र घोडेस्वार यांनीही विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)
देशात पुन्हा एका प्रतिक्रांतीला सुरुवात
By admin | Published: May 23, 2016 3:00 AM