नागपूर : व्यवसायानुसार देशात जाती पडल्या असतील; पण जातिव्यवस्थेला धर्मशास्त्राचा कुठलाही आधार नाही. जात असणे ठीक आहे; पण जातिभेद पाळणे वाईटच आहे. जातिभेदामुळे आपण आपल्याच लाेकांवर खूप अन्याय केला आहे आणि ही चूक आता सुधारावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह डाॅ. मनमाेहन वैद्य यांनी केले.
हिंदू धर्म-संस्कृती मंदिर, धंताेलीच्या स्थापना दिनानिमित्त ‘सनातन भारत’ या विषयावर बनियन सभागृह, चिटणवीस सेंटर येथे त्यांचे व्याख्यान आयाेजित करण्यात आले. डाॅ. वैद्य यांच्या मते आपल्यात राष्ट्रवादी नव्हे राष्ट्रीयतेचा भाव यायला हवा. काेराेनाकाळात हा भाव निर्माण झाला हाेता, जेव्हा लाखाे लाेक सेवेसाठी बाहेर पडले हाेते. भारत काळानुसार आपल्या व्यवस्थेत परिवर्तन आणि इतरांचेही देशानुकूल अनुकरण करीत आला आहे. संघानेही स्वयंसेवकांमध्ये अनुशासन यावे म्हणून ब्रिटिश मिल्ट्रीकडून परेड आणि बॅण्डपथक स्वीकारले हाेते.
डाॅ. वैद्य म्हणाले, जेव्हा धर्मावर ग्लानी येथे तेव्हा आध्यात्मिक शक्तींचा उदय हाेताे. बाबराचे आक्रमण झाले तेव्हा देशात संत परंपरेच्या रूपात आध्यात्मिक शक्तीचा उदय झाला हाेता. मंदिरात जाणे, पूजापाठ, अर्घ्य करणे म्हणजे धर्म नव्हे, हा केवळ उपासनेचा भाग आहे. धर्म हा आचरणाचा भाग आहे. धर्म म्हणजे डाेळे उघडे करून जगाकडे पाहणे आणि अहंपणाचा त्याग करणे हाेय. आपल्याजवळ असलेले देणे म्हणजे चॅरिटी हाेय; पण जे समाजाकडून घेतले ते परत करण्याचा भाव म्हणजे धर्म हाेय. म्हणून देशाच्या लाेकसभेत धर्मचक्र प्रवर्तनाचा उद्घाेष हाेताे.
भारत शेतीप्रधान देश आहे असे म्हणतात. मात्र भारत हा शेतीसाेबत उद्याेगप्रधान देश हाेता. येथील चामड्याच्या वस्तू, परफ्यूम, मसाले आणि साेने, चांदी, काॅपर अशा धातूंच्या वस्तूंना परदेशात माेठी मागणी हाेती. या वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने नव्हते तर त्या लाेकांच्या घरी बनविल्या जायच्या. कुटुंबातील महिलांपासून बालकांपर्यंत सर्वांचा त्यात सहभाग असायचा. यासाठी काेणत्या विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेची गरज पडली नाही. म्हणून १७व्या शतकात भारताचा व्यापार जगात सर्वाधिक हाेता.
भारतीय परंपरेत आपले आहे तेवढेच स्वीकारण्याचा भाव आहे. भ्रष्टाचार ही भारताची परंपरा नाही. वाहतुकीचे नियम पालन करण्यासाठी साध्या साध्या गाेष्टीत अनुशासन निर्माण व्हायला हवे. आपण जे घेतले ते समाजाला परत करण्याचा भाव हा ईश्वरी पूजेचा भाव आहे आणि हाच भारतीयतेचा भाव आहे. भारताने भाैतिक समृद्धीला नाकारले नाही व आध्यात्मिक शक्तीला साेडले नाही. संपूर्ण जग आज भाैतिक जीवनशैलीने पछाडले आहे आणि सर्वांना सुखी जीवनासाठी अध्यात्माची गरज आहे. या जगाला आध्यात्मिक परंपरेने एकत्र जाेडणे ही भारताची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन डाॅ. वैद्य यांनी केले.