लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यस्तरावर प्रथमच नागपूर विभागातील ग्रामपंचायतींनी कामाची मोहर उमटविली आहे. या अभियानांतर्गत विभागातील सात ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली. भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे १.२५ कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्याच्या डव्वा ग्रामपंचायतीने ५० लाखांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. १५ ग्रामपंचायतींना विभागीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या भजेपार ग्रामपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्तेजनार्थ, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या चिचबोडी ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्त्तेजनार्थ, वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या मिर्झापूर ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्तेजनार्थ, याच जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना उंच उडी (कामाचा प्रगती आलेखात) श्रेणीत प्रत्येकी ५० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहेत. यात सेलू तालुक्याच्या हिंगणी ग्रामपंचायतीचा आणि कारंजा तालुक्याच्या ठाणेगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
१ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. विपीन इटनकर त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विभागीय समन्वयक संकेत तालेवार व ईशा बहादे यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले आहे.
विभागीयस्तरावर या १५ ग्रामपंचायती ठरल्या अव्वल
- चंद्रपूर - माजरी (ता. भद्रावती), नंदा (ता. कोरपना). आनंदवन (ता. वरोरा), भेंडवी (ता. राजुरा), पेटगाव (ता. सिंदेवाही) आणि कुकुडसात (ता. कोरपना).
- वर्धा - नाचनगाव (ता. देवळी), आंजी (मोठी) (ता. वर्धा), हिंगणी (ता. सेलू), ठाणेगाव (ता. कारंजा), राजनी (ता. कारंजा)
- भंडारा जिल्ह्यातील खरबी (ता. भंडारा) ग्रामपंचायतीसह नागपूर जिल्ह्यातील गोधनी (ता. नागपूर), नेरी मानकर (ता. हिंगणा), खुर्सापार (ता. काटोल) ग्रामपंचायतींना बक्षीस जाहीर झाले आहेत. विभागातील सर्वोत्तम जिल्हा परिषदांमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेला बक्षीस जाहीर झाले आहे.