नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शेतकरी मुद्द्यावरुन खडाजंगी होताना दिसत आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच देशात सुरु असणाऱ्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधी भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला डिवचण्याचे प्रकार केले. मात्र यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बेळगाव कारवार, निपाणी या भागात आजही मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. याठिकाणी राहणारे नागरिक हिंदू नाहीत का? केंद्र सरकार बाहेरच्या हिंदूंना न्याय द्यायला निघालेत पण देशातील हिंदूंना न्याय देणार नाही का? असा सवाल त्यांनी भाजपाला उपस्थित केला.
तसेच सुप्रीम कोर्टात कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू घेतली. कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपाचेच सरकार आहे. मग बेळगाव, कारवार सीमाप्रश्न का सोडवला जात नाही? जर तुम्हाला देशातील हिंदूंना न्याय देता येत नसेल तर बाहेरच्या हिंदूंना घ्यावं हे म्हणण्यास काय अर्थ आहे? बाहेरील हिंदूंना आश्रय द्या पण त्यांना ठेवणार कुठे याचं स्पष्टीकरण आधी द्यावं असंही भाजपाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुनावले.
दरम्यान, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असा शब्दप्रयोग करत मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी एकत्र प्रयत्न करुयात असं आवाहन केलं त्याचसोबत बेळगाव कारवार पाकिस्तानात आहे का? सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडते असं सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आली नसल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.