लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात दिलासा मिळावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने शुक्रवारी घंटानाद आंदोलन केले. शिवसेनेने आपले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करीत त्यांच्या वचननाम्याची यावेळी होळी करण्यात आली.
महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सांगितले की, शिवसेनेने आपल्या वचननाम्यात ३०० युनिटपर्यंत वीज नि:शुल्क करण्याचे व वीज दरामध्ये ३० टक्के कपात करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते कमी करण्याऐवजी उलट दर वाढवण्यात आले. नागरिकांना भरमसाट वीज बिल पाठवण्यात आले. वीज बिलात दिलासा मिळावा म्हणून आपतर्फे सातत्याने मागणी केली जात आहे.
आंदोलनात पक्षाचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, जगजीत सिंह, शंकर इंगोले, भूषण ढाकुलकर, प्रशांत निलाटकर, कृतल वेलेकर, गिरीश तितरमारे, संजय सिंह, प्रतीक बावनकर, आकाश कावळे, लक्ष्मीकांत दांडेकर, वैशाली डोंगरे, दीपाली पाटील, अमोल हाडके, स्वीटी इंदूरकर, माधुरी नहाते, शीला श्रीवास्तव आदी उपस्थित होते.