पणजोबाच्या जात वैधता प्रमाणपत्राचा पणतीला फायदा : हायकोर्टाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:31 PM2019-04-19T22:31:04+5:302019-04-19T22:31:43+5:30
जात सिद्ध करण्यासाठी जुनी कागदपत्रे अत्यंत उपयोगी ठरतात. एका प्रकरणात पणतीला तिच्या पणजोबाने काढून ठेवलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचा फायदा झाला. त्या आधारावर पणतीला समान जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पणतीला दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जात सिद्ध करण्यासाठी जुनी कागदपत्रे अत्यंत उपयोगी ठरतात. एका प्रकरणात पणतीला तिच्या पणजोबाने काढून ठेवलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचा फायदा झाला. त्या आधारावर पणतीला समान जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पणतीला दिलासा मिळाला.
पायल गराटे असे पणतीचे नाव असून ती नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाला शिकत आहे. तिचे पणजोबा हिरामण गराटे यांना त्यांच्या अर्जावरून माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. त्या आधारावर माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पायलने अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावा दाखल केला होता. परंतु, समितीने तिचा दावा खारीज केला. पणजोबाला कारणे नमूद न करता वैधता प्रमाणपत्र देण्यात आले असे मत समितीने निर्णयात नोंदवले. त्याविरुद्ध पायलने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी प्रकरणातील विविध बाबी तपासल्यानंतर पायलची याचिका मंजूर केली व तिला चार आठवड्यात माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्यात यावे असा आदेश समितीला दिला. समितीने कायदेशीर तरतुदी लक्षात घेताना चूक करून पायलचा दावा खारीज केला. तिच्या पणजोबाने वैधता प्रमाणपत्र अवैधपणे मिळविल्याचे काहीच पुरावे नाही. उलट ते प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय अंतिम झाला आहे. तसेच, पायल व तिच्या पणजोबाच्या नात्याबाबतही काहीच वाद नाही असा निष्कर्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयात नमूद करण्यात आला.