लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील दुर्बल व मागास घटकांपर्यंत सामाजिक न्यायाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी दिशा सामाजिक न्यायाची ‘परिवर्तन’ या पुस्तकाच्या माध्यमातून सर्व योजनांची माहिती एकत्रितरीत्या सुलभपणे उपलब्ध झाली आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहचविण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ‘परिवर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल होते. यावेळी आ. समीर मेघे, पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर, अनिल सवई आदी उपस्थित होते.जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागातर्फे योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी दिलेल्या निधीमधून या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली असून, विद्यार्थी व विविध घटकांसाठी असलेल्या योजना तसेच मागील पाच वर्षांतील प्रगतीसंदर्भात माहितीचा समावेश परिवर्तन या पुस्तकात करण्यात आला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेले शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, अपंगांसाठी असलेल्या योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, व्यवसाय प्रशिक्षण आदी योजनांचा समावेश परिवर्तन या पुस्तकातून करण्यात आला आहे.