लोकमत न्यूज नेटवर्क
कांथी (पश्चिम बंगाल) : विधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आला असताना भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील प्रचारसभेदरम्यान नाव गुलदस्त्यातच ठेवले. भाजपची सत्ता आली तर बाहेरील नव्हे तर स्थानिक नेताच मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. तृणमूल कॉंग्रेसकडून बंगालला आपली मुलगी हवी अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीचे पर्यटक असे संबोधण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक विरुद्ध तिऱ्हाईत असा वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य आले आहे.
बंगालने संपूर्ण भारताला वंदेमातरमच्या भावनेत बांधले आहे. मात्र त्याच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उमेदवारांना बोहिरागोतो म्हणजे बाहेरचा असल्याचा दावा करत आहेत. बंगाल ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रविंद्रनाथ टागोर व सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या व्यक्तींची भूमी आहे व तेथे कुणीही भारतीय बाहेरचा नाही, असे मोदी म्हणाले. केंद्र शासनाने चक्रीवादळग्रस्तांसाठी निधी पाठविला होता. मात्र तो भाच्याने लुटला असे म्हणत तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
बंगालला बॉम्ब, बंदुक, हिंसेपासून मुक्ती हवी
बंगालमध्ये हिंसा व बॉम्बस्फोटांच्या अनेक घटना घटतात. या स्थितीला बदलावे लागेल. बंगालला शांती - स्थिरता हवी असून बॉम्ब, बंदुक व हिंसेपासून मुक्ती हवी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.