अजय संचेती : औषधविज्ञानशास्त्र विभागाच्या महामेळाव्याचा समारोपनागपूर : देशातील निर्यातीमध्ये औषधांचा फार मोठा वाटा आहे. पुढील काळात औषध उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. उद्योगाचा विचार करता नागपूर सर्व दिशांनी सोयीचे आहे. ‘फार्मा’कडे आजच्या घडीला देशातील सर्वात यशस्वी उद्योग म्हणून पाहण्यात येत आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्रात विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. फार्मा हबसाठी नागपूर बेस्ट असल्याचे मत राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधविज्ञानशास्त्र विभागातर्फे आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून संचेती उपस्थित होते. प्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे, निवृत्त आयुक्त डॉ. सत्यनारायण शर्मा, पुरुषोत्तम अग्रवाल, विनय ठाकूर, विभागप्रमुख डॉ.नरेश गायकवाड, आयोजन समितीचे समन्वयक लवलिन खुराणा उपस्थित होते. औषध कंपन्यांची नागपूरकडे नजर गेली आहे. येथे ‘फार्मा पार्क’, वैद्यकीय उपकरणे, ‘फार्मा क्लस्टर’ व संशोधन केंद्र उभे राहिले पाहिजे. यासाठी खासगी क्षेत्राकडूनदेखील पुढाकार अपेक्षित आहे. सरकारही मदत देण्यास तयार आहे. परंतु मागताना अति करू नये. जे संभव आहे तेच मागावे. असे मेळावे, इंडस्ट्री मीट घेऊन हब होणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारकडे अभ्यासपुर्ण मांडणी करावी लागेल. स्थानिक इंडस्ट्री असोसिएशनला यात सहभागी करावे लागेल. डॉ.गायकवाड यांनी या परिषदेच्या आयोजनामागील प्रास्ताविक मांडले. माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ तसेच नागपूरच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन सत्यनारायण शर्मा यांनी केले. (प्रतिनिधी)
‘फार्मा हब’ साठी नागपूर बेस्ट
By admin | Published: January 11, 2016 2:49 AM