लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवार २ ० मार्च रोजी हुताशनि पौर्णिमा (होळी) आहे. या दिवशी सकाळी १०.४३ वाजता पौर्णिमा प्रारंभ होत असून, २१ मार्च रोजी सकाळी ७.१० वाजता पौर्णिमा समाप्ती आहे. या दिवशी सकाळी १०.४३ वाजता भद्रेचा प्रारंभ असून, भद्रेची समाप्ती रात्री ८.५६ वाजता आहे. त्यामुळे भद्राप्रमुख सोडून भद्रेच्या पुच्छकाळात म्हणजेच सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिका प्रज्वलित केल्यास हरकत नाही. परंतु होळी प्रज्वलित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मुहूर्त रात्री ८.५६ नंतर आहे, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.यावेळी उद्योग वेळ असून त्याचा स्वामी सूर्य म्हणजे रवि याचा शुभ प्रभाव वातावरणात राहणार आहे. सर्वसाधारणपणे सूर्यास्तानंतर दोन तासांनी होलिकादहन करावे, असा शास्त्रात उल्लेख आहे. या दिवशी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र, शूल योग असून चंद्र कन्या राशीतून भ्रमण करणार असल्याचे डॉ. वैद्य म्हणाले. होळीच्या दिवशी मन्वादी तिथी आहे. चौदा मन्वंतरांच्या आरंभाच्या वर्षातून चौदा तिथी असतात. त्यातील फाल्गुन शुद्धा पौर्णिमा ही एक प्रारंभ तिथी आहे. दुपारी १२ ते १.३० राहुकाळ आहे. या सुमारास मंगळ ग्रह सायंकाळी पश्चिमेला दिसेल. गुरु ग्रह जो सणांचा आनंद द्विगुणित करतो तो मध्यरात्रीला पूर्वेच्या अवकाशात दिसेल. शनि मध्यरात्री माथ्यावर तर प्रेमाचा कारक शुक्र ग्रह पहाटे पूर्वकपाली दिसेल. मनाचा कारक ग्रह चंद्र कन्या या बुधाच्या राशीत चार अंश ५८ कला, १२ विकलावर असल्यामुळे मोठा दिसेल व वातावरण आणि अवकाश चंद्रप्रकाशात न्हाऊन निघेल, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. हा दिवस शुभ कार्यास अशुभ आहे. या दिवशी विष्णुवदिन मेषायन आहे. २१ मार्चला धुलिवंदनाला कर असल्यामुळे २० व २१ मार्च हे दिवस वर्ज्य दिवस आणि क्षयदिन आहेत, असेही डॉ. वैद्य यांचे म्हणणे आहे.
होळी पेटविण्यासाठी सर्वोत्कृष्ट वेळ सायंकाळी ८.५६ नंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:08 PM