नागपूर : सडक्या सुपारीचा मध्य भारतातील सर्वात मोठ्या तस्करांपैकी एक असलेला कुख्यात भांजा ऊर्फ वसिम बावला याच्या अखेर सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने मुसक्या बांधल्या. त्याची ३० जूनपर्यंत ईडी कोठडी मिळविण्यात आल्याने सुपारीची मध्य भारतात तस्करी करणाऱ्या कुख्यात तस्करांचे धाबे दणाणले आहे.
सुपारीबाज वसिम बावला भांजा म्हणून कुख्यात आहे. त्याचे इंडोनेशिया, म्यानमारसह अनेक देशातील सुपारी तस्करांशी निकटचे संबंध आहेत. आसाममधील ट्रान्सपोर्टर, गोदाम मालक आणि या गोरखधंद्यात गुंतलेल्यांशी कोट्यवधींची आर्थिक देवाणघेवाण करून वसिम भांजा नागपुरात सडकी सुपारी आणतो आणि त्यावर साथीदारांच्या मदतीने रासायनिक प्रक्रिया करून ती सुपारी छोट्या तस्करांना विकतो.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गोरखधंद्यातून त्याने आणि साथीदारांनी शेकडो कोटींची माया जमविली आहे. ‘लोकमत’ने त्या संबंधाने वारंवार वृत्तही प्रकाशित केले आहे. त्याची दखल घेत आधी सीबीआयने आणि नंतर गेल्या वर्षी ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात छापेमारी केली होती. यावेळी वसिमकडून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तसेच संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर वसिमला समन्स पाठविण्यात आले. मात्र त्याने प्रतिसादच दिला नाही. तो वारंवार पत्ता आणि फोन नंबर बदलवून ईडीच्या अधिकाऱ्यांना चकमा देत होता. अखेर २२ जूनला ईडीने वसिम भांजा याच्या मुंबईत मुसक्या बांधल्या आणि त्याला विशेष पीएमएलए कोर्टात हजर करून त्याचा ३० जूनपर्यंत कस्टडी मिळवली. सध्या वसिमची कसून चाैकशी सुरू आहे.
भारतात अशा प्रकारे अवैध मार्गाने सुपारी आणून कोट्यवधींची हेरफेर करणारे सुपारी माफिया शासनाचा कर चुकवून सरकारलाही कोट्यवधींचा फटका देतात. हे लक्षात आल्याने दोन वर्षांपूर्वी सीबीआयने नागपूरमधील ४ सुपारी व्यापाऱ्यांसह देशभरातील १९ व्यापाऱ्यांच्या गोदाम तसेच कार्यालयावर छापे घातले होते. नागपुरातील मोहम्मद रजा, अब्दुल गनी टॉवर्स, गुलाम फारूख नुरानी आणि हिमांशू बद्रा या चार व्यापाऱ्यांकडून त्यावेळी मोठी कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती.
टोपण नावाने करतात तस्करी
नागपुरातून मध्य भारतात सडक्या सुपारीची तस्करी करणाऱ्यांमध्ये वसिमसोबतच मौर्या, हारू आनंद, संजय पटना, ईर्शाद गनी, आसिफ कलिवाला, चारमिनार यांचीही नावे घेतली जातात. गेल्या काही दिवसांपासून या सुपारी तस्करांनी मध्य भारतात प्रचंड हैदोस घातला आहे. यातील अनेक जण टोपण नावानेच मिरवतात.
ईडीच्या कर्मचाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न
वसिम बावला याने कारवाई टाळण्यासाठी चक्क ईडीच्या कर्मचाऱ्यांना लाच देऊन तपासासंबंधीची गोपनीय कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने परदेशातील सुपारी तस्करीतून कोट्यवधींचे भारतीय चलन (रोकड) इतरत्र लपविल्याचाही संशय आहे. त्याचे आसाममधील अनेक सुपारी तस्कर, ट्रान्सपोर्टर, गोदाम मालक आणि गुन्हेगारांशी संबंध असल्याचाही संशय आहे.