नागपूर : शेअर बाजारात व म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ओळखीच्याच व्यक्तीने एका व्यक्तीचा विश्वासघात केला आणि तब्बल २१.३५ लाखांचा गंडा घातला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
किरण सुजित सोमकुंवर (४९, कोलबा स्वामी फ्रेंड्स कॉलनी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची विवेक सुखचंद मोहने (५०) याच्याशी ओळख होती. विवेक त्यांच्याच वस्तीत राहत होता व तो शेअर बाजारात ट्रेडिंग करतो अशी माहिती किरण यांना होती. विवेकने अनेकदा त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास खूप फायदा होतो असे अनेकदा सांगितले होते. त्याने वारंवार किरण यांना विविध उदाहरणे देत गुंतवणूक करण्याचा आग्रह केला.
ओळखीचाच व्यक्ती असल्याने किरण यांनी त्याच्यावर विश्वास टाकला व २० जानेवारी २०२० ते ६ जून २०२३ या कालावधीत त्याला २१.३५ लाख रुपये दिले. विवेकने ते पैसे शेअर बाजार व म्युच्युअल फंडात गुंतवले असल्याची थाप त्यांना मारली. मात्र तो कधीही त्यांना स्टेटमेंट दाखवत नव्हता. दरवेळी काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करायचा. किरण यांनी त्याला परतावा कधी मिळेल असे विचारले असता त्याने ठोस उत्तर दिले नाही. त्यानंतर तो अचानक गायबच झाला. किरण यांनी माहिती काढली असता त्याने एकही रुपया गुंतवला नव्हता. अखेर त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात विवेकविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून त्याचा शोध सुरू आहे.