लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भागीदारीत सराफा दुकान सुरू करण्याची थाप मारून जवळच्या मित्रासोबत एका आरोपीने विश्वासघात केला. सोने, दुकान आणि फर्निचरच्या नावाखाली त्याच्याकडून १८ लाख रुपये घेतल्यानंतर आरोपीने त्याचा मित्र तसेच मित्राच्या वडिलांना धमक्या दिल्या. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.
गजेंद्र महानंद पानतावणे असे आरोपीचे नाव असून तो बुद्धनगर पाचपावलीत राहतो. वर्धमाननगरात राहणारे प्रवीण गाैतम कोठारी (वय २७)याच्यासोबत गजेंद्रची मैत्री होती. कोठारींना सराफाचा अनुभव असल्याने गजेंद्रने त्यांना तीन वर्षांपूर्वी एक दुकान दाखवले आणि तेथे सोन्याचे दुकान भागीदारीत सुरू करण्यासाठी गळ घातली. ९ सप्टेंबर २०१८ ला तसा करारनामा करून आरोपीने १० लाखांचे सोन्याचे दागिने, पाच लाखांचा धनादेश घेऊन तीन लाख रुपये फर्निचरवर खर्च करायला लावला. अशा प्रकारे १८ लाख रुपये कोठारींना खर्च करण्यास सांगून तीन वर्षे झाली तरी दुकान लावले नाही. तो बनवाबनवी करत असल्याने कोठारींनी त्याला आपले दागिने आणि रक्कम परत मागितली असता आरोपीने प्रवीण तसेच त्यांच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. प्रवीण यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची प्रदीर्घ चाैकशी केल्यानंतर मंगळवारी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---