नागपूर : भारत विरुद्ध इग्लंड टी २० क्रिकेट मॅचवर खयवाडी करणाऱ्या ४ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने गुरुवारी रात्री ९.४५ वाजताच्या दरम्यान गजाआड करून त्यांच्या ताब्यातून ६ लाख ३८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राकेश उर्फ पिंटू मोरेश्वर भाईक (४८, रा. बडकस चौक), अरविंद हरीभाऊ मुदगल (४८, रा. आशिर्वादनगर), विशाल केशव सोळंके (३४, रा. तेलंगीपूरा गांधीबाग) आणि रोशन एकनाथ नंदनवार (३९, रा. तांडापेठ, पाचपावली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक गुरुवारी रात्री ९.४५ वाजताच्या दरम्यान वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुकेश मालवन (रा. कोल्हे हाऊसिंग सोसायटी, तरोडी) याच्या घरी भारत विरुद्ध इंग्लंड टी २० क्रिकेट मॅचवर आरोपी खयवाडी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता आरोपी मोबाईलवर संभाषण करून सट्ट्याची रक्कम आॅनलाईन खयवाडी करताना आढळले. आरोपींच्या ताब्यातून २८ मोबाईल, दोन लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल, बुस्टर, टीव्ही, लाईन बॉक्स व चार दुचाकी असा एकुण ६ लाख ३८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचा पाहिजे असलेला साथीदार निशान चौधरी (रा. बडकस चौक) याच्या विरुद्ध वाठोडा ठाण्यात कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.