यासंदर्भात शनिवारी सरकार्यवाह म्हणाले की, कोरोना साथरोगाचा विळखा देशाला पडला आहे. परिस्थिती विक्राळ रूप धारण करतेय. या वातावरणात नागरिकांनी आशा, विश्वास आणि सकारात्मक वातावरण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोना साथरोगाच्या संकटात सापडलेल्या कुटुंबांबद्दल सरकार्यवाह यांनी संवेदना व्यक्त केल्या. तसेच समाजाने एकमेकांच्या सहकार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व सामाजिक व धार्मिक संघटना, संस्था आणि उद्योजकांना त्यांनी या संकटकाळात यथासंभव योगदान देण्याची साद घातली आहे.
अनेक कुटुंबांनी काेराेनामुळे आपले प्रियजन गमावले आहेत. त्यांचे दुःख, वेदना शब्दात मांडणे कठीण आहे. परिस्थिती बिकट असली तरी समाज म्हणून संघर्षाची आमची शक्ती कायम ठेवली पाहिजे. परस्पर सहकार्य, स्नेह, संयम आणि अनुशासनाचे पालन करून आम्ही या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास होसबळे यांनी व्यक्त केला. या संकटकाळात नेहमीप्रमाणेच संघाचे स्वयंसेवक विविध प्रकारच्या सेवाकार्यात सक्रिय योगदान देत आहेत. त्यासोबतच धार्मिक आणि सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य लोकदेखील त्यांच्या शक्तीनुसार योगदान देताना दिसून येतात. सेवाकार्यात सक्रिय असणाऱ्यांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्क लावणे, स्वच्छता अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासोबत शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शासन-प्रशासन, आरोग्य कर्माचारी, स्वच्छता कर्मचारी यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन होसबळे यांनी केले.