रिझर्व्ह बँकेचे नागरिकांना आवाहन : बोगस जाहिरातींवर भाळू नकानागपूर : दहा लाख पौंड जिंकले असून या रकमेसाठी दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करणाऱ्या मोबाईलवरील मॅसेज आणि ई-मेलपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने केले आहे. अशा प्रकारचे भ्रामक आणि वित्तीय प्रलोभन देणारे मॅसेज आणि ई-मेल अनेक जणांना येत आहेत. शिवाय याची जाहिरातसुद्धा करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर या कामात लिप्त लोक संबंधित जाहिरात आणि ई-मेलसाठी रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारचा उपयोग करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. अशा भ्रामक जाहिरातीला बळी पडणारे नागपुरात अनेकजण आहेत. या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा भ्रामक जाहिराती, ई-मेल आणि एसएमएस आदींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशांना उत्तर देऊ नये, अशी ताकीद दिली आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही कामाविना तुम्हाला एक रुपया देत नाही, मग कोट्यवधींची रक्कम अनोळखी कसा देऊ शकतो, यावर गांभीर्याने विचार करावा. याशिवाय शून्य टक्के व्याजदरातसुद्धा कर्ज देण्याचे खोटे आश्वासन दिले जाते. मॅसेज पाठविणारा कोणत्याही विशेष बँक खात्यात काही रक्कम जमा करण्यास सांगतो. नंतर शहानिशा केली असता खाते बंद असते आणि रक्कम घेऊन तो फरार झालेला असतो. उच्चशिक्षितसुद्धा अशा प्रकाराला बळी पडले आहेत. नोंदणी नसलेल्या कंपन्या आणि अवैध संस्थांनी रक्कम स्वीकारणे, ही बाब भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिनियम १९३४ च्या कलम ४५ एस अंतर्गत प्रतिबंधित आहे. रिझर्व्ह बँक अशा गुंतवणुकीवर कोणताही लाभ देण्याची हमी देत नाही. कोणत्याही विशेष व्यक्तीचे खाते उघडत नाही आणि कुणालाही खात्यात रक्कम जमा करण्यास सांगत नाही. बँकेकडून नोंदणीकृत सर्व संस्थांची यादी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)नागरिकांनी जागरूक राहावेरिझर्व्ह बँकेतर्फे वित्तीय समावेशन आणि विकास विभागाच्या (एफआयडीडी) माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमांतून आणि वित्तीय साक्षरता अभियानाद्वारे सर्वसामान्यांना अवैध संस्थांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात येते. बँकेचे अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. राजेश आसुदानी, सहायक महाप्रबंधक, रिझर्व्ह बँक, नागपूर.
वित्तीय प्रलोभनापासून सावधान!
By admin | Published: December 27, 2015 3:20 AM