लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोणताही साप दिसला की प्रत्येकाचा थरकाप उडणे साहजिक आहे. असे असले तरी या सरपटणाऱ्या प्राण्यांबाबत बऱ्यापैकी जागृती लोकांमध्ये निर्माण झाली असल्याने आता मारण्याऐवजी सर्पमित्रांना बोलावून त्याचे संरक्षण करण्यावर लोकांचा भर असतो. साप हा निसर्गातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक आहे. १९७२ च्या वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याला मारणे किंवा त्याच्याशी खेळणे हा गुन्हा असून सापांचा खेळ करणाऱ्या गारुड्यांवर कारवाई करण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.पावसाळ्यात खाचखळगे व बिळांमध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर पडतात. शिवाय त्यांना आवश्यक असलेले भक्ष्य मानवी वस्तीत असल्याने ते मानवी वस्तीत प्रवेश करतात. मानवी वस्तीत साप दिसला की नागरिक थेट सर्पमित्रांना बोलवितात. पकडलेले साप स्वत: जवळ न ठेवता ते वनविभागाच्या स्वाधीन करने गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात तसे घडतच नाही. काही प्रामाणिक सर्पमित्र वनविभागाच्या स्वाधीन करतातही पण काही या सापांचे हाल करतात. त्याच्यासोबत खेळत असलेले व्हिडिओ व्हायरल करतात. स्वत:च्या स्टंटबाजीसाठी सर्पमित्र पकडलेले साप स्वत:जवळच ठेवतात. तर काही वेळा हे पकडलेले साप विषारी की बिनविषारी हे पाहून त्याची तस्करी देखील केली जाते. हा कायद्याने गुन्हा आहे. सापाचे हाल करणाऱ्या, त्यांच्याशी खेळणाºया अशा गारुड्यांवर कारवाई करण्याबाबत वनविभाग सज्ज असून अशांची माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.काही वर्षांपूर्वी सापांचा खेळ करणाऱ्या गारुड्यांऐवजी सर्पमित्राच्या रूपात नवे गारुडी आज मोठ्या प्रमाणात गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. त्यांच्यावर बंदी घालण्याच्या दृष्टीने वनविभाग प्रयत्न करीत आहे. एवढेच नाही तर नागपंचमीच्या दिवसांत गावोगावी वनविभागाचे कर्मचारी गस्त घालणार आहेत. तसेच गाव-शहरातील मंदिर परिसरातदेखील वनकर्मचारी सक्रिय राहणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली.दीड हजार सापांना जीवदानसर्पमित्रांनी पकडलेली साप नागपंचमीच्या दिवशी एकत्र करून जंगलात न सोडता ते ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट केंद्राकडे आणून द्यावे. आत्तापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून सुमारे १ हजार ५०० साप वाचविण्यात यश आले असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी दिली. सापांशी खेळ करून त्यांचे हाल करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विरुद्ध आहे. जे असे प्रकार करतात त्यांच्यावर वनविभाग कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला.
सापांशी खेळाल तर खबरदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 1:21 AM