लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतंगबाजांनो खबरदार... यापुढे नायलॉन मांजा लावून पतंग उडविल्यास तुमची खैर नाही. पोलीस कडक कारवाई करतील. लाखो नागपूरकरांना सुखावणारा हा आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी लाखो नागपूरकरांना ही एक चांगली भेट दिली आहे.
मकर संक्रांतीला दोन आठवडे वेळ आहे. मात्र, पतंगबाजांची हुल्लडबाजी आधीच सुरू झाली असून, त्यामुळे एका तरुणाचा गळा कापला गेला, तर पतंगाच्या मागे धावत सुटलेल्या एका बालकाला वाहनाने उडविल्यामुळे त्याचा जीव गेला. पतंगांची कापाकापी करताना बहुतांश पतंगबाज नायलॉनचा मांजा वापरतात. तो एखाद्या शस्त्रासारखा धारदार असतो. त्यामुळे पतंगबाज खेळ करीत असले तरी अनेक निरपराधांचा गळा कापला जातो. नाक, कान, तोंड, गाल कापले जाऊन चेहरा विद्रुप बनतो. अनेकांच्या जिवावर बेतते. मांजा अडकून पडल्याने दुचाकीचालकांचे अपघात होतात. माणसांसोबतच पशूपक्ष्यांच्या जीविताचीही मांजामुळे हानी होते. खांबावर, झाडात झुडुपात मांजा अडकून पडल्याने पशूपक्ष्यांना गंभीर दुखापत होते. गेल्या वर्षी पतंगबाजांमध्ये हाणामाऱ्या घडल्याच्याही अनेक घटना घडल्या. एकूणच मांजामुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. तो लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कलम १४४ फाैजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच आदेश जारी केला. त्यानुसार, नायलॉन मांजाची विक्री करणे, साठवणूक करणे आणि वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करून कुणी नायलॉन मांजाची विक्री अथवा साठवणूक आणि वापर करताना दिसल्यास त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८ अन्वये कडक कारवाई केली जाणार आहे. १ ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
पालकांनो लक्ष द्या
हा आदेश मांजाची विक्री आणि साठवणूक करणाऱ्या दुकानदारांसाठी आहे. सोबतच मांजा खरेदी करून त्याचा वापर करणाऱ्यांसाठीही लागू आहे. त्यामुळे पतंग उडविणाऱ्या आपल्या मुलांवर विशेष लक्ष देण्याची जबाबदारी पालकांवर आहे. त्यांनी आपल्या पाल्यांचे या संबंधाने समुपदेशन करावे, असे आवाहनही या आदेशाच्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आले आहे.